जम्मू-काश्मीरच्या नर्सिंग विद्यार्थिनीचा नागपूर मेडिकलमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 08:47 PM2023-07-06T20:47:09+5:302023-07-06T20:47:58+5:30
Nagpur News रुग्णसेवेत करिअर करण्याचे स्वप्न बाळगून जम्मू काश्मीरमधून नागपुरातील मेडिकलच्या बी.एससी. नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी रात्री अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली.
नागपूर : रुग्णसेवेत करिअर करण्याचे स्वप्न बाळगून जम्मू काश्मीरमधून नागपुरातील मेडिकलच्या बी.एससी. नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी रात्री अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली. तिच्या दोन वर्ग मैत्रिणी मेडिकलच्या ‘आयसीयू’मध्ये भरती आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
शीतल कुमार त्या मृत विद्यार्थिनीचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ३ जुलै रोजी रात्री शीतलला उलट्या झाल्या. ४ जुलै रोजी तिला हगवण लागली. त्रास कमी होत नसल्याचे पाहत सकाळी मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी तिला भरती होण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला. डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध घेऊन ती नर्सिंग होस्टेलमधील आपल्या रुमवर परतली. ५ जुलै रोजी तिला ताप आला. यामुळे पुन्हा ती बाह्यरुग्ण विभागात आली. डॉक्टरांनी तपासल्यावर तिला वॉर्ड क्र. ४८ मध्ये भरती केले. तिची लक्षणे गॅस्ट्रोसारखी होती. त्यानुसार उपचाराला सुरुवात झाली. त्याच दिवशी रात्री तिची प्रकृती खालवली. तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. परंतु, रात्री १२ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह आई-वडिलांकडे सुपुर्द केला.
-मैत्रिणीला बसला मानसिक धक्का
शीतलची रुममेंटने जेव्हा तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिला मोठा मानसिक धक्का बसला. तिला तातडीने वॉर्ड क्र. ५१ मधील ‘आयसीयू’मध्ये दाखल केले. तर दुसऱ्या एका मैत्रिणीला शीतलसारखी लक्षणे दिसून आल्यावर तिलाही ‘आयसीयू’मध्ये भरती केले आहे.
-मृत्यू कशाने अद्यापही अस्पष्ट
शीतलची प्रकृती ढासळण्यापूर्वी तिने पाणीपुरी खाल्ल्याचे सांगितले जाते. परंतु मृत्यूच्या एक दिवसापूर्वी लघवीतून रक्त गेल्याचे तिने मैत्रणीला सांगितले होते. त्याच मैत्रिणीलाही लघवीतून रक्त गेल्याने तिला भरती करण्यात आले. यामुळे शीतलचा मृत्यू गॅस्ट्रोने झाला की डेंग्यूमुळे की आणखी कोणत्या कारणाने हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार भरती असलेल्या दोन्ही विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर आहे.