नोटाबंदी हे अमेरिकेचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:10 AM2017-09-26T00:10:08+5:302017-09-26T00:10:58+5:30

नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामागे अमेरिकेचा हात होता व भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचण्यात आले.

NUTRITION US PRACTICAL | नोटाबंदी हे अमेरिकेचे षड्यंत्र

नोटाबंदी हे अमेरिकेचे षड्यंत्र

Next
ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : मोदी अधिकाºयांच्या जाळ््यात फसले, अर्थशास्त्राचे त्यांना ज्ञानच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामागे अमेरिकेचा हात होता व भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचण्यात आले. काही उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले आणि त्याचा फटका आता संपूर्ण देश भोगत आहे, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नागपुरात सोमवारी त्यांनी वृत्तपत्रांच्या संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध बाबींवर आपले मत प्रकट केले.
नरेंद्र मोदींना अर्थशास्त्राचे ज्ञान नाही. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व इतर डिजिटल पेमेंट करणाºया अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर नोटाबंदी लादली. नोटाबंदीनंतर पैसे मोजण्यास मोठा कालावधी लागला. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा झाला. यात प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ज्यावेळी विदेशात जातात तेव्हा येथील गोष्टींचे ‘मार्केटिंग’ त्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र ते तेथे विक्रेते म्हणून न जाता खरेदीदार बनून जातात. सोबतच चेकबुक घेऊन जातात. अशा पद्धतीने परदेशात मोठमोठे करार होत असतील तर कुठलाही देश त्यांचे ‘रेड कार्पेट’ स्वागत करेलच, असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
‘बुलेट ट्रेन’मुळे प्रभूंचे खाते गेले
बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याची भूमिका यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. ‘बुलेट ट्रेन’ला विरोध केला म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढण्यात आले. त्यांच्या जागी आलेले पीयूष गोयल यांनी लागलीच आठ दिवसात हा विषय मार्गी लावला. मुळात ही ट्रेन भारतासारख्या देशात चालू शकत नाही. ती चालवायची असेल तर ९० टक्के सवलत द्यावी लागेल. कराड ते चिपळूण हा रेल्वे मार्ग रद्द करून बुलेट ट्रेनला प्राध्यान्य देणे म्हणजे, श्रीमंती चोचले पुरविण्याचा प्रकार आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. बुलेट ट्रेनमुळे जपानमध्ये अक्षरश: बंद पडलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. या ट्रेनमुळे आपल्या देशाचा कमी आणि जपानचाच जास्त फायदा आहे, असे ते म्हणाले.
मोदी संघावर पडले भारी
संघाच्या मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांनाच भारी पडले आहेत. संघाच्या पदाधिकाºयांचे मोदी ऐकत नाहीत, त्यामुळे संघाला त्यांचा संताप आला आहे. राम माधव, विनय सहस्रबुद्धे यांना फेरबदलाच्या वेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, असा संघाचा आग्रह होता. मात्र मोदींनी त्यांना डाववले. त्यामुळे पुढील दोन वर्षात मोदींना शह देण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निर्मला सीतारामन यांना अनुभव नसतानादेखील संरक्षण मंत्रालयासारखे मोठे खाते कसे काय मिळाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे परराष्ट्र खाते अक्षरश: पोलिसी खाक्याप्रमाणेच चालवत आहेत, असा चिमटादेखील यावेळी चव्हाण यांनी काढला.
नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही
काँग्रेसमध्ये कोणाला मंत्री करायचं, कोणाला काय पद द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष, त्यांचे सल्लागार, त्यावेळचे पक्षाचे सरचिटणीस अँटोनी यांच्या बैठकीत हे ठरते. इतकी वर्षे पक्षात राहूनही नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही. राणे यांनी पक्षावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे चव्हाण यांनी ठामपणे सांगितले
काँग्रेस रस्त्यांवरील आंदोलनात मागे
२०१४ नंतर काँग्रेसचे अखिल भारतीय स्तरावरील महाअधिवेशन झालेले नाही. २०१४ नंतर तीन वर्षे काँग्रेस पराभवाच्या धक्क्यातून सावरली नव्हती. ते कधी करावे, कुठे घ्यावे हेही ठरत नाही. काँग्रेसपासून लोक दूर का गेले, यावर चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस रस्त्यांवरील आंदोलनात कुठे तरी कमी पडत आहे. ‘सोशल मीडिया’वरील प्रचार-प्रसारातदेखील मागे पडत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र आता मोदींचा प्रभाव ओसरत आहे. लोक त्यांच्यावर टीका करीत आहेत. हा बदल नक्कीच वेग घेईल. आम्हीदेखील रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहोत. आमचे नेते आता हिंदीतून संवाद साधतील. विरोधकांनी आता एकत्र आले पाहिजे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Web Title: NUTRITION US PRACTICAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.