१२८ शाळांमध्ये उघड्यावर शिजतोय पोषण आहार! दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?
By गणेश हुड | Published: May 20, 2023 04:45 PM2023-05-20T16:45:04+5:302023-05-20T16:45:32+5:30
Nagpur News गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शासनाकडूनच ‘प्रि-फेब्रीकेटेड किचन शेड’तयार करून दिले होते. परंतु यातील तब्बल १२८ शाळांमधील किचन शेड नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे या शाळांत पोषण आहार उघड्यावर शिजवावा लागत आहे.
गणेश हूड
नागपूर : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, स्वच्छ ठिकाणी तयार करण्यात यावा. हा आहार तयार करताना स्वयंपाक घरात स्वच्छता बाळगावी असे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शासनाकडूनच ‘प्रि-फेब्रीकेटेड किचन शेड’तयार करून दिले होते. परंतु यातील तब्बल १२८ शाळांमधील किचन शेड नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे या शाळांत पोषण आहार उघड्यावर शिजवावा लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय माध्यमांसोबतच खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा व मूलभुत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. द्सरीकडे जिल्ह्यातील जि.प.च्या १२८ वर शाळांमध्ये मध्यान्य भोजन (शालेय पोषण आहार) शिजविण्यासाठी किचन शेडच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, मागील काही महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी खिचडी शिजवताना दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा घटना टाळण्यासाठी शासकीय शाळांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र किचन शेड तयार करण्यात आले होते. शाळेत खिचडी शिजवताना कोणताही अनुचित प्रकार घडायला नको म्हणूनच सुसज्ज असे किचन शेड देण्यात आले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किचन शेडचे कच्चे बांधकाम करून आणि प्रि फेब्रिकेटेड असे दोन प्रकार करण्यात आले होते.
जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव
जिल्ह्यातील ज्या १२८ शाळांमधील प्रि फेब्रिकेटेड किचन शेड नादुरुस्त आहेत. त्यामुळे उपलब्ध वर्गखोलीत पोषण आहार शिजविला जातो. परंतु त्या रुममध्ये स्वच्छता किती आहे, हे सांगणे कठिण आहे. या नव्याने किचन उभारण्यासाठी जि.प.शिक्षण विभागाकडून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडे प्रस्ताव सादर करुन निधीची मागणी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.