नायलॉन मांजाला ढील नाही

By admin | Published: January 12, 2016 02:44 AM2016-01-12T02:44:51+5:302016-01-12T02:44:51+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नायलॉन मांजा विक्रेत्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

The Nylon Manga does not relax | नायलॉन मांजाला ढील नाही

नायलॉन मांजाला ढील नाही

Next

हायकोर्टाची स्पष्टोक्ती कारवाई सुरूच ठेवा विक्रेत्यांना दिलासा नाकारा
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नायलॉन मांजा विक्रेत्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान, शासनाने नायलॉन मांजावर कायमची बंदी आणण्यावर उत्तर सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तहसील कार्यालयातील अधिकारी अवैधरीत्या नायलॉन मांजा जप्त करीत आहेत व पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवित आहेत असा दावा करून रिद्धीसिद्धी पतंग व्यापारी संघटनेने रिट याचिका दाखल केली आहे. मकरसंक्रांती काळात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. याशिवाय, मकरसंक्रांतीच्या काळात ठोक विक्रेत्यांना नायलॉन मांजाचा साठा व विक्री करता येत नाही. पर्यावरण विभागाने पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा किंवा त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक धागा वापरण्यास परवानगी देऊ नये. ठोक विक्रेत्यांना मकरसंक्रांतीच्या आधीच नायलॉन मांजाची विक्री करण्यापासून थांबविण्यात यावे. नायलॉन मांजापासून होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरल्यामुळे होणाऱ्या वाईट परिणामांसंदर्भात नागरिकांना जागृत करावे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. परंतु, अधिसूचनेत बंदीचा काळ स्पष्ट नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रशांत गोडे तर, मध्यस्थांतर्फे अ‍ॅड. मोहित खजांची व अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.

७५ हजाराचा नायलॉन मांजा जप्त
जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम

नागपूर : नायलॉन मांजाविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, शहरात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ७५ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
आगामी संक्रांत सणाच्या दृष्टीने सामान्य नागरिक तसेच पक्ष्यांना नायलॉन मांजाच्या वापरामुळे गंभीर स्वरूपाच्या इजा होऊ शकतात. तसेच नायलॉन मांजामुळे नागरिक व पक्ष्यांचा अपघाती मृत्यूदेखील होऊ शकतो. नायलॉन मांजा हा पर्यावरणाला घातक असून, तो वातावरणात सहजासहजी नष्ट होत नाही. त्यामुळे नदी, नाले, गडर, नैसर्गिक पाणी स्रोत यांना अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच या मांजाच्या वापरामुळे विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित होऊन आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकरसंक्रांतीच्या सणाप्रीत्यर्थ नागपुरात फार मोठ्या प्रमाणावर पतंगी उडवण्यात येतात. या पतंगी उडविण्याकरिता नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. यामुळे उपरोक्त नुकसान व धोका निर्माण झालेला आहे.
त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाकडून या बाबीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून नायलॉन मांजाच्या वापरावर निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच नायलॉन मांजाची साठणूक व विक्री होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर तहसीलदार, महसूल निरीक्षक व तलाठी यांची एक विशेष समिती नेमली आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली शहरात गेल्या १ जानेवारीपासून धडक मोहीम सुरू केली आहे. जुनी शुक्रवारी, गोळीबार चौक, गिट्टीखदान, जरीपटका, बर्डी या ठिकाणी मोठ्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकण्यात आल्या आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Nylon Manga does not relax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.