संक्रांत बेतली शेकडो निष्पाप पक्ष्यांच्या जीवावर; शेकडो जीव नायलॉन मांजाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 09:07 PM2023-01-16T21:07:48+5:302023-01-16T21:10:57+5:30
Nagpur News नायलाॅन मांजा घेऊन केलेल्या पतंगबाजीच्या उन्मादामुळे यावर्षीची संक्रांतही माणसांप्रमाणे शेकडाे पक्ष्यांच्या जीवावर बेतली.
विशाल महाकाळकर
नागपूर : नायलाॅन मांजा घेऊन केलेल्या पतंगबाजीच्या उन्मादामुळे यावर्षीची संक्रांतही माणसांप्रमाणे शेकडाे पक्ष्यांच्या जीवावर बेतली. पक्षीप्रेमींनी केलेली सूचनांना धुडकावून नागरिकांनी केलेल्या पतंगबाजीत जखमी झालेल्या पक्ष्यांना पक्षीमित्रांनी रुग्णालयापर्यंत नेले. यातील २० पक्ष्यांवर सध्या उपचार सुरू आहेत, पण गंभीर अवस्थेत आणलेल्या पाच पक्ष्यांना उपचारापूर्वीच जीव गमवावा लागला.
संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा उत्सव गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. रविवारी संक्रातीच्या दिवशी आकाश पतंगांनी व्यापले हाेते. मात्र अनेकदा आवाहन करूनही आणि पाेलिसांचा बंदाेबस्त असूनही असंख्य बेजबाबदारांनी नायलाॅन मांजाचा माेह त्यागला नाहीच. त्यामुळे जे परिणाम व्हायचे, ते आता दिसून येत आहेत. झाडांवर, तारांवर अडकून असलेल्या या मांजात अडकून शेकडाे पक्षी जायबंदी झाले आहेत. नाेंदच न झालेल्या असंख्य पक्ष्यांचा जीव गेला असून शेकडाे तर जखमांनी विव्हळत असण्याची शक्यता आहे.
दरम्यान पक्षीप्रेमींनी नागरिकांना आवाहन करीत पक्ष्यांना वाचविण्याचे अभियान राबविले हाेते. त्यानुसार शहरातील अनेक पक्षीमित्रांनी जखमी पक्ष्यांची नायलाॅन मांजातून सुटका करीत वनविभागाच्या सेमिनरी हिल्सस्थित ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला आणले. टीटीसीच्या डाॅक्टरांकडून अशा ३०च्या आसपास जखमी पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. यातील काही पक्षी बरेही झाले. मात्र अतिशय गंभीर अवस्थेत आणलेल्या ५ पक्ष्यांचा उपचार करण्यापूर्वीच जीव गेल्याची माहिती टीटीसीच्या डाॅक्टरांनी दिली. शहरात जिथे कुठे असे मांजात अडकलेले पक्षी दिसल्यास त्यांना टीटीसीपर्यंत आणण्याचे किंवा जखमी पक्ष्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन कुंदन हाते यांनी केले आहे.