नायलॉन मांजाने गळाच नव्हे तर हाडही कापले जाऊ शकते..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 09:07 PM2022-01-08T21:07:53+5:302022-01-08T21:10:10+5:30
Nagpur News काचमिश्रित व प्लास्टिक काेटेड सिंथेटिक असल्याने नायलॉन मांजा एखाद्या लाेखंडाच्या तारासारखा मजबूत बनताे. ताे हाताने सहजासहजी ताेडता येणे शक्य नाही.
नागपूर : धारदार सुऱ्यासारखा माणसांचा गळा, अवयव आणि पक्ष्यांचे पंख छाटणारा नायलाॅन मांजा केवळ जीवघेणाच नाही तर पर्यावरणासाठीही प्रचंड घातक आहे. हा प्लास्टिक काेटेड मांजा सडत नाही, कधी नष्टही हाेत नाही. वर्षानुवर्षे टिकून राहताे. त्यामुळे तारावर किंवा झाडांवर अडकलेला मांजा अनेक वर्षांपर्यंत प्राणी किंवा पक्ष्यांसाठीही घातकच ठरताे.
नायलाॅन मांजा इतका घातक का आहे याचे कारण तज्ज्ञांनी स्पष्ट केले. साधारण सुताचा धागा हा विघटनशील असताे. ताे सहज तुटताे आणि थाेड्या कालावधीत ताे नष्टही हाेताे. मात्र, नायलाॅन मांजाचे तसे नाही. हा सिंगल युस्ड प्लास्टिकसारखा आहे. काचमिश्रित व प्लास्टिक काेटेड सिंथेटिक असल्याने ताे एखाद्या लाेखंडाच्या तारासारखा मजबूत बनताे. ताे हाताने सहजासहजी ताेडता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या वाहनचालकाच्या शरीरावर आला तर काही कळण्याच्या आत शरीराचे हाडही कापू शकताे. दुसरे म्हणजे अनेक वर्षे जमिनीत गाडून ठेवला तरी प्लास्टिकच्या तत्त्वाप्रमाणे नष्ट हाेत नाही. तारांवर, झाडांवर अडकलेल्या मांजावर ऊन, वारा, पावसाचा प्रभाव पडत नाही व ताे कित्येक वर्ष तसाच टिकून राहताे. त्यामुळे जेवढा काळ ताे झाडांवर अडकून आहे, तेवढी वर्षे प्राणी व पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरू शकताे. म्हणून या मांजा निर्मितीवरच प्रतिबंध आणण्याची गरज आहे.
एमपीसीबी, वनविभाग कुचकामी
किंग काेब्राचे समन्वयक अरविंदकुमार रतुडी यांनी सांगितले, नायलाॅन मांजा एकप्रकारचा प्लास्टिकच असल्याने ताे नष्ट करणे ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही जबाबदारी ठरते. मात्र, तज्ज्ञांच्या टीमने याचे गुणधर्म सांगितले, तेव्हा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मान्य तर केले, पण हव्या त्या उपाययाेजना केल्या नाहीत. खरंतर अशावेळी एमपीसीबी आणि वनविभागाच्या दस्त्याद्वारे कारवाईसाठी तयार हाेणे गरजेचे आहे, पण हे दाेन्ही विभाग आपली जबाबदारी ढकलतात. पाेलीस विभाग, मनपासह या विभागांनीही सामाजिक संघटनांना घेऊन कारवाई केली तर या मांजाच्या वापरावर प्रतिबंध लागू शकताे.
नायलाॅन मांजा प्राणी, पक्ष्यांसह पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे हाच उपाय आहे. विक्रेता किंवा वापरकर्त्यांवर कारवाई करण्यापेक्षा मांजा निर्मात्यावरच कठाेर कारवाई करणे आवश्यक आहे.
- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हीजिल संस्था.