ओ माय गॉड... नागपुरात सिक्वेन्सिंग केलेले सर्व बाधित ओमायक्रॉन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 07:00 AM2022-01-14T07:00:00+5:302022-01-14T07:00:03+5:30
Nagpur News ‘नीरी’ने केलेल्या ‘जीनोम सिक्वेन्सिंग’चा दुसरा अहवाल गुरुवारी समोर आला व त्यातील सर्व कोरोनाबाधितांना ‘ओमायक्रॉन’चाच संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.
मेहा शर्मा
नागपूर : राज्यातील बहुतांश कोरोनाबाधित डेल्टा व्हेरिएंटचे असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी नागपुरातील ‘नीरी’च्या आकडेवारीमुळे या दाव्याला धक्का बसला आहे. ‘नीरी’ने केलेल्या ‘जीनोम सिक्वेन्सिंग’चा दुसरा अहवाल गुरुवारी समोर आला व त्यातील सर्व कोरोनाबाधितांना ‘ओमायक्रॉन’चाच संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.
‘नीरी’ने मागील आठवड्यात ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ची सुरुवात केली. ‘नीरी’ने ७ ते १० जानेवारी या कालावधीत कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ७३ जणांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले. गुळणीवर आधारित ‘डब्लूजीएस’ (व्होल जीनोम सिक्वेन्सिंग) या प्रणालीचा यात उपयोग करण्यात आला. त्यातील सर्व ७३ नमुने ओमायक्रॉन बाधित निघाले. ९ जानेवारी रोजीदेखील ‘नीरी’त ५३ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले. त्यातील ५१ नमुने ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळले. या दोन्ही ‘सिक्वेन्सिंग’मध्ये एकूण नमुन्यांपैकी ९८.४१ टक्के नमुने ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशासन व वैद्यकीय यंत्रणांची झोप उडविणारी आहे.
डेल्टाची जागा ओमायक्रॉनने घेतलीय
या अभ्यासातून नेमका कोणता व्हेरिएंट जास्त संसर्ग पसरवतो आहे, हे चित्र समोर येते. डिसेंबरपर्यंत आम्ही केलेल्या सिक्वेन्सिंगमध्ये डेल्टाचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले. जानेवारीत डेल्टाची जागा ओमायक्रॉन व्हेरिएंटने घेतली आहे. पुढील काही सिक्वेन्सिंगने ही बाब सिद्धच होईल, असे ‘नीरी’च्या ‘एन्व्हायर्नमेन्टल व्हायरोलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा खैरनार यांनी सांगितले. ‘डब्लूजीएस’ प्रक्रिया जास्त मेहनतीची, वेळ घेणारी आणि महाग आहे. त्यामुळेच काही निवडक नमुन्यांचे या प्रक्रियेतून सिक्वेन्सिंग करण्यात आले. पॉझिटिव्हिटी दर कमी असल्याने याअगोदर सर्वच बाधितांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ शक्य होते. आता मात्र निवडक नमुन्यांसाठीच ही प्रक्रिया करता येईल, असे त्यांनी सांगितले. ‘जीनोम सिक्वेन्सिंग’च्या अहवालाचा कालावधी पाच दिवसांवरून दोन दिवसांवर आला आहे.
शहरात ओमायक्रॉन वरचढ : मनपा आयुक्त
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीदेखील शहरात ओमायक्रॉन व्हेरिएंट वरचढ ठरत असल्याचे मान्य केले आहे. सद्य:स्थितीत ओमायक्रॉन हाच जास्त वरचढ व्हेरिएंट असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ नागरिकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे व कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले पाहिजे. ओमायक्रॉनची संसर्ग क्षमता लक्षात घेता जास्तीत जास्त वेळ घराच्या आतच राहण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.