एनटी प्रवर्गाच्या पालकाला दिले ओबीसीचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:05+5:302021-07-15T04:08:05+5:30
नागपूर : आरटीई अंतर्गत मुलांचे प्रवेश करण्यासाठी जात प्रमाणपत्राची गरज आहे. एका एनटी प्रवर्गातील पालकाने सेतू कार्यालयातील एका ...
नागपूर : आरटीई अंतर्गत मुलांचे प्रवेश करण्यासाठी जात प्रमाणपत्राची गरज आहे. एका एनटी प्रवर्गातील पालकाने सेतू कार्यालयातील एका दलालाकडून जात प्रमाणपत्र बनवून घेतले. त्याने एनटी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र न देता ओबीसीचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे त्यांच्या मुलाचा आरटीईत प्रवेश रद्द झाला.
त्या पालकाने सांगितले की रामदासपेठ येथील एका शाळेत जातीचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यासाठी त्यांनी सेतू कार्यालयात संपर्क देखील केला. प्रमाणपत्र बनविण्यासाठी त्यांनी एका दलालाची मदत घेतली. त्याला ५ हजार रुपये दिले. पालक हे एनटी प्रवर्गात मोडतात. पण दलालाने त्यांना ओबीसीचे जात प्रमाणपत्र बनवून दिले. त्यामुळे त्यांच्या मुलाचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यांना शिक्षण विभागाशी संपर्क करण्यास सांगितले.
दुसऱ्या एका पालकाने सांगितले की जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. परंतु अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाचा प्रवेश होऊ शकला नाही. गोरेवाडा येथील एका पालकाने सांगितले की, प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण त्यांच्याजवळ प्रमाणपत्र बनविण्यासाठी पैसेच नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत मुलाचा प्रवेश केला नाही. सरकारने जात प्रमाणपत्राची अट शिथिल करावी अशी मागणी त्यांनी केली.