ओबीसी महिलांचा हुंकार

By admin | Published: November 6, 2016 02:10 AM2016-11-06T02:10:17+5:302016-11-06T02:10:17+5:30

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने २७ नोव्हेंबर रोजी शहरात ओबीसी महिलांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

OBC Women's Hunker | ओबीसी महिलांचा हुंकार

ओबीसी महिलांचा हुंकार

Next

राष्ट्रीय ओबीसी महासंघ : २७ नोव्हेंबर रोजी महिला महाअधिवेशन
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने २७ नोव्हेंबर रोजी शहरात ओबीसी महिलांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. धनवटे नॅशनल कॉलेजच्या भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनाची जय्यत तयारी केली जात असून, या पार्श्वभूमीवर शनिवारी महासंघाची काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक डॉ. बबनराव तायवाडे, राजकीय पक्ष समन्वयक डॉ. खुशालचंद्र बोपचे, ईश्वर बाळबुधे, महिला समितीच्या प्रमुख सुषमा भड, डॉ. शरयू तायवाडे व रेखा बारहाते उपस्थित होत्या.
या बैठकीत महिला महाअधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान महिला अधिवेशनाला संपूर्ण विदर्भातील दोन हजारांपेक्षा अधिक ओबीसी महिला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, महासंघाच्यावतीने या महाअधिवेशनापाठोपाठ हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर महामोर्चा काढण्याची तयारीसुद्धा चालविली आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीत महिला अधिवेशनासोबतच या महामोर्चाच्या तयारीचेसुद्धा नियोजन करण्यात आले. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी महासंघाच्यावतीने रोज ठिकठिकाणी बैठकी घेतल्या जात आहेत. याशिवाय २७ नोव्हेंबर रोजी आयोजित महिला महाअधिवेशनाचे उद्घाटन बीड येथील सुशिलाताई मोराळे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई मेंढे, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा विद्या चव्हाण व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा जीवतोडे उपस्थित राहतील. दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात ‘भारतीय संविधान, मंडळ आयोग व ओबीसीचे आरक्षण’, ‘ओबीसी महिला व अंधश्रद्घा’, आणि ‘ओबीसी महिलांची दशा, दिशा व सक्षमीकरण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.(प्रतिनिधी)

८ डिसेंबर रोजी महामोर्चा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने महिला महाअधिवेशनासोबतच ८ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणाऱ्या महामोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा लाखोंच्या संख्येत राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी महासंघाच्या वतीने गावोगावी बैठकी घेतल्या जात आहे.

Web Title: OBC Women's Hunker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.