ओबीसींना केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार फसवीत आहे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:11+5:302021-09-19T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रातील भाजप सरकार असो की राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे दोन्ही सरकार आरक्षणाच्या मुद्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रातील भाजप सरकार असो की राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे दोन्ही सरकार आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसींची फसवणूक करीत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळत असलेले राजकीय आरक्षण भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नाकर्तेपणामुळेच आज समाप्त झाले. मुळात त्यांना ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचाच नसून असाच खितपत ठेवायचा आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी बांधवांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या या फसवणुकीच्या षडयंत्रापासून सावध राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे होऊ घातलेली जनगणना ही जातनिहाय करण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी संघर्ष करेल. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत पक्षातर्फे ५० जागांवर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्यात येईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
पत्रपरिषदेला शहर अध्यक्ष रवी शेंडे व जिल्हाध्यक्ष विलास वाटकर यांच्यासह राजू लोखंडे, राहुल वानखेडे, प्रफुल मानके, मुरलीधर मेश्राम, विवेक हाडके, धर्मेश फुसाटे, राहुल दहिकर, अजय सहारे, गायक प्रकाशनाथ पाटणकर, सिद्धांत पाटील आदी उपस्थित होते.