उपमुख्यमंत्री फडणवीस न्यायालयात हजर, लेखी स्वरूपात दिली माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 08:59 PM2023-04-15T20:59:20+5:302023-04-15T20:59:56+5:30

यावेळी कोर्ट परिसरात झालेली गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Objection to Election Affidavit matter Deputy Chief Minister devendra Fadnavis present in court, information given in written | उपमुख्यमंत्री फडणवीस न्यायालयात हजर, लेखी स्वरूपात दिली माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

उपमुख्यमंत्री फडणवीस न्यायालयात हजर, लेखी स्वरूपात दिली माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

googlenewsNext

नागपूर : निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्या प्रकरणात प्रतिवादी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे शनिवारी उपस्थित झाले. तब्बल सव्वातास ते कोर्टात हजर होते. यावेळी कोर्ट परिसरात झालेली गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी ॲड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती. या तक्रारीवरील गेल्या सुनावणीदरम्यान उके यांच्या बाजूने युक्तिवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रतिवादीला न्यायालयात बयानासाठी उपस्थित राहावे लागते. त्यामुळे, फडणवीस यांना शनिवारी १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागणार होते. त्यानुसार, ते उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांचे बयान नोंदविले. त्यांनी लेखी स्वरूपात आपले बयान सादर केले. न्यायालयात त्यांच्या बाजूने ॲड. देवेन चव्हाण आणि ॲड. उदय डबले यांनी बाजू मांडली. या प्रकरणी ६ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

फडणवीसांचे वकील म्हणाले रेग्युलर प्रोसिजर !
या प्रकरणात कोर्टापुढे आतापर्यंत जे साक्षीपुरावे झाले, त्या संबंधाने न्यायालयाने फडणवीस यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवर तुमचे काय मत आहे, काय उत्तर आहे, अशी विचारणा केली. कोर्टाची ही रेग्युलर प्रोसिजर असते, फडणवीसांचे वकील ॲड. उदय डबले यांनी पत्रकारांना सांगितले. यातील एकही गुन्हा आपल्याला मान्य नाही. राजकीय वैमनस्यातून आणि राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन हे सगळे खोटे आरोप आपल्यावर लावण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टात म्हटल्याची माहितीही ॲड. डबले यांनी पत्रकारांना दिली.
 

Web Title: Objection to Election Affidavit matter Deputy Chief Minister devendra Fadnavis present in court, information given in written

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.