वेधशाळेने २४ तासात अंदाजच बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:08+5:302021-08-29T04:12:08+5:30
नागपूर : नागपूर प्रादेशिक विभागाच्या वेधशाळेने दिलेला पावसाचा अंदाज पुन्हा २४ तासातच बदलला आहे. वेधशाळेने शुक्रवारी संपूर्ण विदर्भभर येलो ...
नागपूर : नागपूर प्रादेशिक विभागाच्या वेधशाळेने दिलेला पावसाचा अंदाज पुन्हा २४ तासातच बदलला आहे. वेधशाळेने शुक्रवारी संपूर्ण विदर्भभर येलो अलर्ट देऊन जोराच्या पावसाचा अंदाज जाहीर केला होता. मात्र शनिवारी त्यात पुन्हा बदल दर्शविला आहे.
मान्सून १० दिवस लांबणीवर पडल्याने ऑगस्टच्या अखेरच्या दिवसात मुंबईत आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात पाऊस येईल, असा अंदाज गेल्या आठवड्यात हवामान खात्याने वर्तविला होता. या आठवड्यात नागपूरच्या वेधशाळेने सातत्याने तीन वेळा येलो अलर्ट दर्शवित विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज कळविला होता. मात्र निसर्गाने हुलकावणी देत हे अंदाज खोटे ठरविले आहेत. शुक्रवारी दुपारी दिलेल्या अंदाजानुसार, संपूर्ण विदर्भातच येलो अलर्ट दर्शविण्यात आला होता. मात्र शनिवारी दुपारी पुन्हा अंदाज बदलला. नव्याने जाहीर झालेल्या अंदाजात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात २८ व २९ तारखांना पाऊस सांगितला. मात्र शनिवारी पुन्हा पावसाने हुलकावणी दिली. हवामान विभागाने ३० तारखेला पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. एकदोन ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नागपुरातही दुपारच्या सुमारास काही भागामध्ये पाऊस आला. मात्र नोंद घेण्याएवढा पाऊस पडला नाही.
...
उष्णतामान ३२ अंश सेल्सिअसवर
मागील २४ तासात विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाची नोंद नाही. यामुळे वातावरणातील उकाडा पुन्हा वाढल्याचे जाणवत आहे. बहुतेक जिल्ह्यामध्ये ऐन ऑगस्टअखेरही किमान उष्णतामान ३२ अंश सेल्सिअसच्या वरच नोंदविले गेले आहे. अकोला आणि वर्धामध्ये ३४ अंशाच्या वर तापमान होते. नागपूर व गोंदियात ३३ च्या वर, तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ते ३२ अंश सेल्सिअसवर होते.
...