अंत्ययात्रांना लग्नमंडपांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:15+5:302021-01-08T04:25:15+5:30
नागपुर : मोमीनपुरा कब्रस्तान रोडवरील लग्नमंडप अंत्ययात्रांना अडथळे निर्माण करीत आहेत. लग्नमंडपावर आक्षेप घेतल्यास संबंधित व्यक्ती भांडायला पुढे येतात. ...
नागपुर : मोमीनपुरा कब्रस्तान रोडवरील लग्नमंडप अंत्ययात्रांना अडथळे निर्माण करीत आहेत. लग्नमंडपावर आक्षेप घेतल्यास संबंधित व्यक्ती भांडायला पुढे येतात. त्यामुळे पोलिसांनीच योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
मोमीनपुरा कब्रस्तान रोडवरील अतिक्रमण गंभीर समस्या आहे. दुकानदारांनी रोडच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण केले आहे. तसेच, परिसरातील नागरिक लग्न व अन्य कोणतेही कार्यक्रम असल्यास रोडवरच मंडप बांधतात. त्यामुळे कब्रस्तानमध्ये जाणाऱ्या अंत्ययात्रा अडतात. अंत्ययात्रा बराचवेळ थांबवून ठेवावी लागते. आधीच दु:खात असलेल्या व्यक्तींना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागतो. कब्रस्तान समितीचे सदस्य व कर्मचाऱ्यांनी रोडवर अतिक्रमण होऊ नये यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु, त्यांचे कुणीच ऐकले नाही. उलट त्यांनाच दमदाटी करण्यात आली. परिणामी, परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, समितीचे अध्यक्ष मौलाना सैयद कमर अली कादरी यांनी बैठक घेतली. त्यातील निर्णयानुसार, समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी तहसीलचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. तसेच, रोडवरील अतिक्रमण हटविण्याची व संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात समितीचे प्रभारी अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी कामिल अंसारी, अध्यक्ष मौलाना सैयद कमर अली, सचिव सैयद अशफाक अली, अफजल हुसैन, अजीज ताजी, औलिया मस्जिदचे अध्यक्ष सईद अली बरकाते, अब्दुल सईद, कलीम अश्रफ आदींचा समावेश होता.