नाग नदी प्रकल्पात पुलांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:08 AM2021-02-09T04:08:56+5:302021-02-09T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या पश्चिमेकडील लाव्हा गावाजवळ असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर व पिवळी नदीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या पश्चिमेकडील लाव्हा गावाजवळ असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर व पिवळी नदीच्या संगमापर्यंत जागोजागी ३५ पूल आहेत. यातील बहुसंख्य पुलांची उंची कमी आहे. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना पुलाचे बांधकाम नव्याने करावे लागणार आहे. यासाठी २५० ते ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नदीवरील सर्व पुलांचे बांधकाम निर्धारित कालावधीत व टप्प्याटप्प्याने करावे लागेल. अन्यथा, शहरातील वाहतूक विस्कळीत होईल. यासाठी नियोजनाची गरज आहे.
अंबाझरी तलावातून निघालेल्या नाग नदीवर लगतच रस्ता आहे. येथे पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे. क्रेझी कॅसलने नदी पात्रात पुलाचे बांधकाम केले आहे. पुढे नासुप्रच्या स्केटिंग ग्राउंडचे बांधकाम करताना नदीपात्रावर स्लॅब टाकण्यात आला आहे. येथील नदीपात्र मोकळे करावे लागणार आहे. पुढे शंकरनगर चौकालगत नदीवरील पुलाची उंची कमी आहे. पुनरुज्जीवन करताना नदीपात्र समतल व रुंद करताना या पुलाचे बांधकाम करावे लागेल. काही ठिकाणी दोन वस्त्यांना जोडणारे छोटे पूल आहेत. या पुलांचे नव्याने बांधकाम केले नाही, तर अंतर्गत रहदारी विस्कळीत होईल. परिसरातील वस्त्यांत ये-जा करताना अडचण निर्माण होईल.
सेंट्रल मॉलजवळ नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाची उंची कमी आहे. पुढे कॅनॉल रोडवर महाजबागकडे जाणाऱ्या मार्गावर नदीवर पूल आहे. पंचशील चौकापर्यंत नदीपात्र खुले आहे. पुढे नदीपात्रात बांधकामे असल्याने संगमापर्यंत नदी दिसत नाही. प्रकल्प राबविताना नदीपात्रावरील बांधकाम काढावे लागेल. संगमाच्या थोडे पुढे गेल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूला नदीवर पूल आहे. या पुलाची रुंदी व उंची कमी असल्याने पुलाचे पुन्हा बांधकाम करण्याची गरज आहे. मोक्षधामच्या अलीकडे नदीवर रेल्वे पूल आहे. थोडे पुढे गेल्यानंतर नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाची उंची कमी ठेवण्यात आली आहे. अशीच परिस्थिती डालडा फॅक्टरीकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची आहे. मातंग वसाहतीमधील घरे नदीकाठाला खेटून आहेत. तिथेही पुलाच्या खांबांनी प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. केळीबागकडे जाणाऱ्या मार्गाचाही पूल पुरेसा उंच नाही. शुक्रवारी येथील नदीवर उभारण्यात आलेला पूल असो वा मोक्षधामकडे जाणाऱ्या जगनाडे चौकालगतच्या पुलाची उंची कमी आहे. त्यापुढे हिवरीनगर येथील पुलाचे नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. पारडी दहनघाटाजवळ पुलाची उंची कमी असून पिल्लर नदीपात्रात उभारण्यात आले आहे. अशीच अवस्था पिवळी नदीच्या संगमापर्यंत आहे. नदीवर असलेल्या पुलाची उंची व रुंदी कमी असल्याने पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे. यावर कोट्यवधींचा खर्च करावा लागणार आहे. हा खर्च कोण करणार, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
......
२३५ नाल्यांच्या संगमावर पूल उभारावे लागतील
या नदीला नागपूर शहराच्या हद्दीतच लहानमोठे २३५ नाले येऊन मिळतात. नाल्यांद्वारे शहरातील सिव्हरेज नदीपात्रात येत असल्याने एकूण १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली आहे. नदी पुनरुज्जीवित करताना नाल्याद्वारे येणारे गटार रोखावे लागेल. सोबतच, ज्या ठिकाणी नाले नदीला मिळतात, अशा २३५ ठिकाणी छोटे पूल उभारावे लागतील, त्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही.