परवानगीसाठी गणेश मंडळांची अडवणूक : झोनस्तरावर यंत्रणा सक्षम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:18 PM2019-08-28T21:18:38+5:302019-08-28T21:19:58+5:30
गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाची परवानगी घ्यावी लागते. यामुळे होणारा त्रास कमी व्हावा, याकरिता परवानगीसाठी महापालिकेतर्फे झोनस्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रशासनाने यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मात्र गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गणेशोत्सवाच्या मंडपासाठी महापालिकेच्या झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण वा एसएनडीएलकडून वीजजोडणीसाठी आवश्यक असलेली परवानगी घ्यावयाची आहे. यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भटकंती करण्याची गरज भासू नये, यासाठी सर्व १० झोन तसेच महापालिकेच्या सिव्हिल कार्यालयात परवानगी देण्याची यंत्रणा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र महापालिकेच्या विविध विभागात समन्वयाचा अभाव आहे. एक खिडकी कक्षात संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित नसतात. यामुळे परवानगीसाठी येणाऱ्यांना ताटकळत बसावे लागते, अशी तक्रार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आठ दिवसापूर्वी अर्ज केला असतानाही अद्याप अनेकांना परवानगी मिळालेली नाही. २ सप्टेंबरला गणरायांचे आगमन होत आहे. त्यात रविवार सुटीचा दिवस असल्याने परवनगीसाठी चारच दिवस आहेत.तीन-चारच दिवस असल्याने परवानगीसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे. याचा महापालिका प्रशासनाने विचार केलेला दिसत नाही.
परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाई
गणेशोत्सव मंडळांनी परवानगी न घेता गणेशमूर्ती बसविल्यास उभारण्यात आलेला मंडप अवैध ठरवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. १५० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्र वा ५० पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था असल्यास अग्निशमन विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडप उभारताना आग नियंत्रणाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे.
झोन अधिकाऱ्यांना निर्देश
गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी झोनस्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी आवश्यक असलेल्या परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निर्देशानुसार यंत्रणा उभारण्यात आली की नाही, याचा आढावा घेणार आहे.
राजेश मोहिते, उपायुक्त मनपा
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ
अर्ज दिल्यावर संबंधित कर्मचारी तातडीने परवानगी देत नसल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. उत्सव जवळ आल्यानंतरही परवानगी मिळत नसल्याने यंदा काय होणार, अशी भीती अनेक मंडळांपुढे आहे. सजावटीसह गणेशोत्सवासाठी इतरही कामे करावयाची असल्याने पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. जोवर परवानगी मिळत नाही, तोवर काही खरे नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परवानगीसाठी किती अर्ज आले, मंजुरी किती जणांना दिली, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही. संबंधित विभागात समन्वय नसल्याचे चित्र आहे.