सावकाराने घेतला वृद्धाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:59 AM2017-07-19T01:59:35+5:302017-07-19T01:59:35+5:30
सावकाराने केलेल्या मारपिटीमुळे जखमी झालेल्या ६५ वर्षीय तुळशीराम डबले यांचा मृत्यू झाला आहे.
खुनाचा गुन्हा दाखल :
तीन दिवसात दुसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावकाराने केलेल्या मारपिटीमुळे जखमी झालेल्या ६५ वर्षीय तुळशीराम डबले यांचा मृत्यू झाला आहे. डबलेच्या मृत्यूला अजनी पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन दिवसात घडलेली दुसरी घटना आहे.
६ जुलै रोजी श्रीरामनगर येथील रहिवासी धीरज गजभिये याने सहकाऱ्याच्या मदतीने तुळशीराम डबले व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या डबले यांचा सोमवारी मृत्यू झाला. डबले हे वस्त्रोद्योग महामंडळातून सेवानिवृत्त झाले होते. अजनीतील विणकर वसाहतीमध्ये ते राहत होते. त्यांना धनंजय व राकेश ही दोन मुले आहेत. गजभिये हा सावकारीचे काम करतो. डबले यांचा मुलगा राकेश याने त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत करण्यासंदर्भात दोघांमध्ये वाद सुरू होता. राकेशच्या मते, बहुतांश रक्कम परत केली आहे. परंतु गजभिये इन्कार करीत आहे. ६ जुलैला रात्री ११ वाजता गजभिये राकेशच्या घरी आला. त्याने पैशाची मागणी केली. त्याचा डबलेंचा मुलगा धनंजय याच्याशी वाद झाला. दोघांमध्ये मारपीट झाली. दरम्यान, गजभिये हा राकेशच्या घरात शिरला. त्याने तुळशीराम डबले यांना शिवीगाळ करणे सुरू केले. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात डबले यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, अजनी पोलिसांनी दोन्ही पक्षावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. सोमवारी रात्री उपचारादरम्यान डबले यांचा मृत्यू झाला. त्याआधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. डबले यांच्या कुटुंबीयांच्या मते, पोलिसांकडे यापूर्वीच गजभिये याची तक्रार केली होती. तो बऱ्याच दिवसापासून धमक्या देत होता. पोलिसांनी तक्रारीवर दुर्लक्ष केल्याने, शेवटी गजभिये याने घरात शिरून वडिलांचा खुन केला.