पाचपावली ठाण्याला घेराव

By admin | Published: January 1, 2016 04:40 AM2016-01-01T04:40:06+5:302016-01-01T04:40:06+5:30

संशयास्पद मृत्यू झालेल्या जरीपटक्यातील राहुल प्रेमदास राऊत (वय २४) नामक तरुणाच्या नातेवाईकांना पोलिसांच्या

Occupation of Panchpawali Thane | पाचपावली ठाण्याला घेराव

पाचपावली ठाण्याला घेराव

Next

नागपूर : संशयास्पद मृत्यू झालेल्या जरीपटक्यातील राहुल प्रेमदास राऊत (वय २४) नामक तरुणाच्या नातेवाईकांना पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर अंतिम संस्कार करता आले नाही. मोठ्या प्रमाणात नातेवाईक असतानादेखील राहुलला पोलिसांनी बेवारस समजून त्याचा मृतदेह पुरला. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी दुपारी शिवसैनिक आणि मृताच्या नातेवाईकांनी पाचपावली ठाण्याला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे तासाभरानंतर जमाव शांत झाला.
जरीपटक्यातील संत कबीरनगरात राहणारा राहुल ११ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी जरीपटका ठाण्यात राहुलच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, टोलवाटोलवी करीत पोलिसांनी शोध घ्या, वाट बघा, असा सल्ला देत त्यांची दखल घेतली नाही. तीन दिवसानंतर मिसिंग दाखल करून पोलीस गप्प बसले. दुसरीकडे कामठी मार्गावरील जलसा बारजवळ त्याचा मृतदेह १२ आॅक्टोबरला संशयास्पद अवस्थेत आढळला. पाचपावली पोलिसांनी त्याची ओळख पटली नसल्यामुळे १५ आॅक्टोबरला त्याचा मृतदेह पुरला.
राहुल महापालिकेच्या वीज विभागात कंत्राटी कामगार होता. तो घरातील सर्वात मोठा होता. त्याचे वडील वीज मंडळात आहेत, तर आई ललूबाई गृहिणी आहे. त्याला कुंदा नामक बहीण असून, छोटा भाऊ केतन खासगी वाहन चालवतो. शिवसैनिक असलेल्या राहुलच्या शोधार्थ त्याचे अस्वस्थ नातेवाईक आणि मित्र इकडे-तिकडे प्रयत्न करीत होते. काही दिवसांपूर्वी राहुलचा मोबाईल मार्टिननगरातील राजेश नामक तरुणाकडे आढळला. त्यामुळे राहुलच्या मित्रांनी राजेशला पकडून चौकशी केली. त्याने हा मोबाईल दुसऱ्या एकाकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याने राहुलसोबत काही तरुणांचा वाद झाल्याची आणि मारहाण केल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
अवघी वस्तीच ठाण्यात पोहचली
या घटनाक्रमानंतर राहुलचा मृत्यू झाल्याचे आणि पोलिसांनी त्याचा मृतदेह पुरल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी माजी महापौर किशोर कुमेरिया, शिवसेनेचे सुनील बॅनर्जी, मनोज शाहू, सूरज गोजे, जितू तिवारी तसेच शेकडो शिवसैनिकांसह राहुल राहत असलेली अवघी वस्तीच गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास पाचपावली ठाण्याला घेराव करण्यासाठी पोहचली. राहुलच्या मृत्यूची कसून चौकशी करा, आरोपींना अटक करा आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा, अशी मागणी जमाव करू लागला. घोषणाबाजीसोबत तणाव वाढत असल्याचे पाहून पाचपावलीचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त संजय लाटकर ठाण्यात पोहचले. त्यांनी जरीपटक्याचे ठाणेदार संजय सांगोले यांनाही बोलवून घेतले. राहुलच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे त्यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले. तसेच राहुलच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून घेण्यास आणि त्याची तातडीने सर्वत्र माहिती न देण्यास कोण कारणीभूत आहे, त्याचीही चौकशी करू, दोषी पोलिसावर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.
राहुलची हत्याच झाल्याचा आरोप
पुढे आलेल्या घटनाक्रमातून राहुलचा संशयास्पद मृत्यू हत्येचाच प्रकार आहे, असा आरोप त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी लावला आहे. ११ आॅक्टोबरच्या रात्री राहुलसोबत असलेल्या आणि त्याचा मोबाईल घेऊन पळणाऱ्याला बोलते केल्यास या प्रकरणातील तथ्य उघडकीस येतील. मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरूनही अनेक बाबी उघड होऊ शकतात, असा दावा शिवसैनिक करीत आहेत.
जरीपटक्याचे दुसरे प्रकरण
हलगर्जीपणामुळे बेपत्ता झालेल्याचा मृत्यू होण्याचे आणि परस्पर त्याचा मृतदेह पुरल्याचे जरीपटका ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हे दुसरे संतापजनक प्रकरण आहे. दोन बालकांचे अपहरण करून दोघांचीही हत्या झाल्याचा संतापजनक प्रकार महिनाभरापूर्वी घडला. मुलांच्या आईवडिलांनी या प्रकरणाची (बेपत्ता होण्याची) तक्रार देऊनही जरीपटका पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे अपहरणकर्त्याने दोन निरागस जीवाची मध्य प्रदेशात नेऊन हत्या केली. हत्येपूर्वी मुलीवर अत्याचारही केला. जरीपटका ठाण्याला त्यामुळे जमावाने घेराव घातला होता. केवळ एकच महिना या प्रकाराला झाला. पोलिसांनी या प्रकरणातही असाच हलगर्जीपणा केला. लगेच राहुलच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली असती तर राहुलच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना त्याच्यावर किमान अंत्यसंस्कार करता आले असते. हयात असतानाही राहुलवर बेवारस समजून अंत्यसंस्कार झाले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच हे घडले. त्यामुळे राहुलच्या नातेवाईकांना आयुष्यभर ती सल राहणार आहे.

Web Title: Occupation of Panchpawali Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.