नागपुरात ऑड-इव्हनचे संकट कायम, केवळ वेळ वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:45 AM2020-07-09T00:45:55+5:302020-07-09T00:47:18+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.
आॅड-इव्हन पद्धत रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविले आहे. याशिवाय दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आल्याचे चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. राज्य शासनाच्या या नियमामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकाने नियमित सुरू राहिल्यास ग्राहक बाजारात येतील आणि विक्री वाढेल. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद राहिल्यानंतर आता तरी शासनाने व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
आॅड-इव्हनमध्ये एक दिवसाआड दुकाने सुरू असल्याने फूटपाथवरील विक्रेत्यांनी बंद दुकानांसमोरच ठिय्या मांडला आहे. यामुळे
दुकानदारांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. हे विक्रेते आता दुकानासमोरून हटायला तयार नाहीत. दुकानदारांचा त्यांच्याशी वाद होत आहे. इतवारी सराफा दुकानासमोर अनेक फूटपाथ दुकानदार दिसून येत आहे. दुकानात मौल्यवान वस्तू असल्याने धोका निर्माण झाला आहे. या दुकानदारांना तेथून हटवावे, अशी मागणी नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याशिवाय गांधीबाग बाजारात अनेक दुकानासमोरील जागेवर फूटपाथवरील विक्रेत्यांनी अवैध कब्जा केला आहे. या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हजची सुविधा नसल्याने कोरोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दुकानदार संघाने केली आहे.