उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:16 AM2018-07-15T00:16:50+5:302018-07-15T00:19:43+5:30
अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.
भगवानाच्या रथाच्या स्वागतासाठी मार्ग मोकळा करीत भाविक पुढे जात होते. सोबतच गंगाजलाने वातावरण शुद्ध करण्यात येत होते. भव्य आणि सुशोभित केलेल्या रथावर पुरोहित भगवानाची सेवा करीत होते. मार्गात पुष्पवृष्टी करून भगवानाचे स्वागत करण्यात आले. कुकडे ले-आऊटच्या विविध मार्गाने रथयात्रा समाज भवनात पोहोचली. येथे भगवानाची पूजा करून त्यांची मूळ स्थानी स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी भवनात भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राच्या सोबत चक्र सुदर्शनची मूळ स्थानावर पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांना बाहेर आणण्यात आले. येथे अभिषेक व पूजनानंतर त्यांना रथावर स्थापन करण्यात आले. रथावर स्थापना केल्यानंतर पुन्हा भगवानाची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर रथाला ओढण्यात आले. मार्गात भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी जय जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, हरि बोल हरि बोलच्या कीर्तनांवर भाविक थिरकताना दिसले. संस्थेचे अध्यक्ष अनुप सत्पती यांनी सांगितले की, उपनिषद आणि पुराणात शरीराला रथ संबोधण्यात आले आहे. जेव्हा या शरीररुपी रथात बसलेल्या आत्मारुपी सारथीच्या मदतीने मनाला आवर घालून इंद्रियरुपी घोड्यांना श्रेष्ठ मार्गाकडे वाटचाल करतो तेव्हा हा रथ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रभुची कृपा सर्वांवर समान रूपाने होते. आमच्या जीवनाचा रथ गतिमान असला पाहिजे. आम्ही आपल्या जीवनाला गतिमान करून राष्ट्र, समाज आणि आत्मोन्नतीसोबत मानवतेची सेवा केली पाहिजे. हीच भगवानाची सर्वात मोठी सेवा आहे. हाच रथयात्रेचा संदेश आहे. यशस्वितेसाठी उपाध्यक्ष एस. एच. नंदा, सचिव एस. दास, गणेश दास, पी. पी. मिश्रा यांनी परिश्रम घेतले.