राज्यातील वीज मीटर रीडिंग करणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ, ८ काळ्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 09:24 PM2022-06-17T21:24:35+5:302022-06-17T21:26:08+5:30
Nagpur News हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना महावितरणने बडतर्फ केले आहे.
नागपूर : हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना महावितरणने बडतर्फ केले आहे. यातील आठ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून, महसुलातदेखील वाढ झाल्याचा दावाही महावितरणने केला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील ३० टक्के मीटर रीडिंग या त्रुटीपूर्ण असल्याचे वृत्त लोकमतनेच सर्वात आधी प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते.
राज्यातील सुमारे २ कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते. वीज मीटर रीडिंगबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. या एजन्सीजने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, आदी प्रकार आढळून येत आहेत. त्याप्रमाणे संबंधित रीडिंग एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु हयगय कायम राहिल्यास एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
या एजन्सींजवर कारवाई
गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रीडिंगच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील १०, जळगाव - ८, अकोला- ७, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक- प्रत्येकी ४, औरंगाबाद- २, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती या परिमंडळातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील आठ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. महावितरणचे प्रबंध निदेशक विजय सिंघल हे स्वत: एजन्सीजच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यात वीज विक्रीमध्ये १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महावितरणच्या महसुलात वाढ झाल्याचा दावाही केला जात आहे.
विदर्भातही २७.८२ टक्के रीडिंग संशयास्पद
महावितरणने काही मोजक्या रीडिंगची तपाासणी केली आहे. यापैकी २९.८२ टक्के रीडिंग संशयास्पद आढळून आले होते. विदर्भातही ४८,२०१ रीडिंगची तपासणी झाली. यापैकी १३,१६७ संशयास्पद आढळून आल्याने, रद्द करण्यात आल्या. एकूण रीडिंग २७.८२ टक्के आहे. यात सर्वाधिक ३८.६९ टक्के रीडिंग एकट्या अकोल्यात संशयस्पद आढळले. येथील सात एजन्सीवर कारवाई झाली होती. अमरावतीमध्ये ३२.६४ टक्के रीडिंगमध्ये त्रुटी असताानाही येथे केवळ एकाा एजन्सीवर कारवाई करण्यात आली. नागपुरातीलही १७.१३ टक्के रीडिंग संशयाास्पद होती. परंतु येथील एजन्सींना सध्यातरी कारवाई झालेली नाही.