नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 06:57 PM2019-06-15T18:57:04+5:302019-06-15T18:58:07+5:30

एका हत्याप्रकरणात फिर्यादी आणि मुख्य साक्षीदार असलेल्या तरुणाच्या बहिणीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार मोबाईलवर फोन, मेसेज करणे, तिला पिक्चरला चलण्याची ऑफर देणे पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले. तरुणीने तक्रार नोंदविल्यामुळे अजनी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस.एस. टेमगिरे याच्याविरुद्ध अजनी ठाण्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Offense of molestation against PSI in Nagpur | नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

Next
ठळक मुद्देतक्रारदाराच्या बहिणीसोबत सलगीचा प्रयत्न : वारंवार, फोन मेसेज करून संपर्क : पिक्चरला चलण्याची ऑफर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका हत्याप्रकरणात फिर्यादी आणि मुख्य साक्षीदार असलेल्या तरुणाच्या बहिणीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार मोबाईलवर फोन, मेसेज करणे, तिला पिक्चरला चलण्याची ऑफर देणे पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले. तरुणीने तक्रार नोंदविल्यामुळे अजनी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस.एस. टेमगिरे याच्याविरुद्ध अजनी ठाण्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. २१ मे च्या रात्री अजनीतील गुंडांनी आशुतोष वर्मा नामक तरुणाची हत्या केली होती. आशुतोषला वाचविण्यासाठी धावलेल्या एका तरुणावरही आरोपींनी हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. याच जखमी तरुणाने अजनी ठाण्यात हत्येची तक्रार नोंदविली होती. पोलिसांच्या रेकॉर्डवर तो या प्रकरणातील फिर्यादीच नव्हे तर मुख्य साक्षीदारही आहे. तो थोडा अडखळत बोलतो. त्यामुळे त्याच्यासोबत त्याची बहीण (वय २५) काही वेळा पोलीस ठाण्यात आली होती. येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक टेमगिरेने तिचा मोबाईल नंबर घेतला होता. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने २७ मे पासून टेमगिरेने तिला बोलवणे सुरू केले. संपर्क वाढवण्यासाठी त्याने तिला फोन, मेसेज करणे सुरू केले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता टेमगिरने त्या तरुणीला सिनेमाला चलण्याची आॅफर दिली. तिला सिनेमाच्या दोन तिकिटांचा फोटो काढून तो व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविला. कधी पोलीस ठाण्यात तर कधी ठाण्याबाहेर उशिरारात्रीपर्यंत तिला भेटायला बोलवून टेमगिरेने तिच्याशी सलगी वाढवण्याचे प्रयत्न चालविल्याने तरुणीने शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे टेमगिरेची तक्रार केली. तो लज्जास्पद वर्तन करतो, असेही तक्रारीत नमूद करून त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावला.
उलटसुलट चर्चेला उधाण
तरुणीच्या तक्रारीच्या संबंधाने अजनी ठाण्यात दिवसभर भूकंपासारखे वातावरण होते. उलटसुलट चर्चा अन् वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दिवसभर मंथन झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री टेमगिरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण टेक्निकल स्वरूपाचे असल्यामुळे टेमगिरेला तूर्त अटक करण्याचे पोलिसांनी टाळले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे अजनीचे ठाणेदार उरलागोंडावार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: Offense of molestation against PSI in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.