बनावट इन्स्टाग्रामवर शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:04 AM2020-11-04T11:04:27+5:302020-11-04T11:04:56+5:30
Teacher Nagpur News Instagram शाळेत मनासारखा विषय मिळण्यात शिक्षिका अडसर ठरत असल्याने एका विद्यार्थ्याने आपला रोष व्यक्त करण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम आयडी बनविली. त्यावर शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळेत मनासारखा विषय मिळण्यात शिक्षिका अडसर ठरत असल्याने एका विद्यार्थ्याने आपला रोष व्यक्त करण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम आयडी बनविली. त्यावर शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा १६ वर्षीय विद्यार्थी राहतो. सुखवस्तू कुटुंबातील या विद्यार्थ्याने दहावीत गणित विषयात कमजोर असूनही तो विषय मिळावा म्हणून हट्ट धरला होता. शाळेतील एका शिक्षिकेचा सूर या विषयाच्या संबंधाने नकारात्मक होता. मात्र त्याचा हट्ट कायम होता. ते पाहून त्याच्या पालकांना मुख्याध्यापकांनी शाळेत बोलविले. त्याच्या हट्टामुळे परीक्षेवर परिणाम होईल, अशी कल्पना शिक्षकांनी पालकांना दिली. मात्र, मुलगा नाराज होऊ नये म्हणून पालकांनी शिक्षक, मुख्याध्यापकांचा सल्ला धुडकावला. आईवडिलांच्या समर्थनामुळे मुलाचे मनोबल चांगलेच वाढले. तो नकारात्मक सूर आळवणाऱ्या शिक्षिकेला धडा शिकविण्याच्या कामी लागला. त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्यावर एका आक्षेपार्ह फोटोवर शिक्षिकेचा चेहरा जोडून तो व्हायरल केला. ते कळाल्यानंतर शिक्षिकेने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण सायबर सेलकडे पाठविले. सायबर सेलने तात्काळ हे अकाऊंट ब्लॉक केले. त्यामुळे तो विद्यार्थी चरफडला. त्याने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्या वेळेलाही पुन्हा बनावट अकाऊंट तयार करून तसाच प्रकार केला. विशेष म्हणजे, हे कुकृत्य करण्यासाठी तो तासन् तास इंटरनेटवर राहत होता. आईवडिलांना ऑनलाईन क्लासचे कारण सांगत असल्याने त्याचे हे कृत्य लक्षात येत नव्हते. दोन अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर त्याने पुन्हा तिसऱ्यांदा तसाच प्रकार केला. यावेळी मात्र त्याची चूक सायबर शाखेच्या लक्षात आली आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. एकुलत्या एक मुलाचे हे कुकृत्य समोर आल्यानंतर आईवडिलांना लज्जेने मान खाली घालण्याची वेळ आली.
शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लासच्या बहाण्याने भलत्याच कामात गुंतल्याचे वास्तव आहे. असे प्रकार उघड होऊनही बदनामीच्या धाकाने पीडित पोलिसांकडे पोहचत नाहीत. त्यामुळे पाल्यावर लक्ष ठेवण्याची पालकांवरची जबाबदारी वाढली आहे.