प्रेयसीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नागपूर कारागृहात टोळीयुद्ध, ८ जखमी
By योगेश पांडे | Published: June 11, 2024 11:02 PM2024-06-11T23:02:11+5:302024-06-11T23:02:21+5:30
विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत एक टोळीयुद्ध झाल्याची बाब समोर आली.
नागपूर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत एक टोळीयुद्ध झाल्याची बाब समोर आली. प्रेयसीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. या घटनेत दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले आहेत. गुन्हेगारांनी कारागृहात लावलेले टीव्ही आणि इतर साहित्यही फोडले. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नरसाळा येथील सूरज गंगाधर कार्लेवार आणि पाचपावलीतील साकीब अन्सारी हे वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात कैद आहेत. दोघांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांनाही त्यांच्यासोबत ठेवण्यात आले आहे.
वृषभ कावळे नावाचा गुन्हेगारही चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. सर्वांना बडीगोलच्या बॅरेक क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. रविवारी रात्री साकिब अन्सारी आणि वृषभ कावळे यांनी सूरज कार्लेवारच्या ग्रुपमधील लोकेशच्या मैत्रिणीबाबत आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. त्यामुळे सूरज संतापला. त्याने त्यांना फटकारले व धमकी दिली. मंगळवारी सकाळी ८ वाजता साकिब, वृषभ आणि त्यांच्या मित्रांनी या रागातून सूरजवर धारदार टिनपत्र्याने वार केले. यात त्याच्या हाताला जखम झाली. हे पाहून सूरजचे मित्र मदतीला आले.
सूरजने मित्रांच्या मदतीने हल्ला केला. त्याने साकिब, वृषभ, मेहबूब, सद्दाम यांना मारहाण केली. बॅरेकमध्ये लावण्यात आलेले टीव्ही संच आणि इतर साहित्यही फोडण्यात आले. या हल्ल्यात दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सुरुवातीला सर्वांनी या घटनेबाबत मौन पाळले होते. प्रकरण गंभीर होण्याची शक्यता पाहून धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.