सेवाव्रती शिक्षकांचे ऋण जपावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:29 AM2017-09-05T00:29:42+5:302017-09-05T00:30:16+5:30
व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी नावाची कथा लिहिली होती. या कथेतला नायक एक शिक्षक असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी नावाची कथा लिहिली होती. या कथेतला नायक एक शिक्षक असतो. अध्यापनाचे सरकारी कार्य एवढीच त्या शिक्षकाची जबाबदारी असते. परंतु तो त्या गावाशी इतका एकरूप होतो, की गावातल्या तक्रारी, गाºहाणी सोडविण्यासाठी लोक त्याच्याकडे येतात. हा बनगरवाडीचा शिक्षक अध्यापनाच्या चौकटीतील मर्यादा ओलांडून अख्ख्या गावाच्या विकासाचे प्रतीक होतो. घडाळ्याच्या काट्याकडे पाहून चालणाºया शिक्षकांच्या आजच्या व्यवहारी युगात बनगरवाडीतील शिक्षक सापडणे दुर्मिळच. पण काही सेवाव्रती शिक्षक आजही अध्यापनासोबतच समाजसेवेचा वसा अधिक प्रमाणिकपणे जपत आहे, त्यातलाच एक शिक्षक म्हणजे प्रमोद नागोराव वानखेडे.
काटोल तालुक्यातील येणवा येथील रहिवासी असलेले प्रमोद वानखेडे १९८९ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. रायगडपासून त्यांची सेवा सुरू झाली, आज ते त्यांच्या गृह जिल्ह्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. २०१४ मध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांची काटोल तालुक्यातील लिंगा या गावात नियुक्ती झाली. गावकºयांना शिक्षणाचा गंध नव्हता, मुले शाळेत येत नव्हती, एवढेच नव्हे तर शाळासुद्धा नादुरुस्त होती, मुलेच येत नसल्यामुळे पटसंख्येचा अभाव, अशा वातावरणात शिक्षणाचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पण बनगरवाडीतील शिक्षकाप्रमाणेच त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि गावकºयांमध्ये सहभागी झाले. शिक्षणाचे मोल गावकºयांना समजविले, गावाचा सरपंच आणि काही प्रमुख व्यक्तींचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा असा परिणाम झाला की गावकºयांनी शिक्षणासाठी खिशातून पैसा काढला. गोळा झालेल्या लोकवर्गणीतून शाळेचा विकास साधला, शाळेला नवीन रूप दिले. अध्यापनाच्या पद्धतीत बदल करून, मुलांमध्ये शिक्षणाप्रती आकर्षण वाढविले. काटोल तालुक्यात पहिल्या डिजिटल शाळेचा मान त्यांनी पटकाविला. त्याच्या प्रयत्नामुळे शाळेतील पटसंख्या वाढली, गावकºयांचा विश्वास त्यांच्यावर वाढला. त्यांच्यामुळे भंगार पडलेल्या वास्तूत शिक्षणाचे मंदिर घडले.
कुठल्याही मानधनाशिवाय प्रशासनाला मदत
शिक्षण विभागात वानखेडे यांची ख्याती आदर्श शिक्षक म्हणूनच नाही तर प्रशासनाचा दुवा म्हणून सुद्धा आहे. त्यांनी सर्वशिक्षा अभियानात गटसमन्वयक म्हणून केलेले काम व त्यांची शिक्षण क्षेत्रातील तत्परता, कामाचा उत्साह बघून शिक्षणाधिकाºयांनी त्यांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे धोरण यशस्वी राबविण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त केले. शाळेतील कामकाज यशस्वीपणे सांभाळून प्रशासनालाही ते तेवढ्यात उत्साहाने कुठल्याही मानधनाशिवाय मदत करीत आहेत.
विद्यार्थी घडविणे हाच उद्देश
मी फार काही वेगळे करीत नाही, शासन ज्यासाठी मला पगार देते, तेच काम मी करतो आहे. हे काम प्रशासनाचे असले तरी, यामागे विद्यार्थी घडविणे हाच उद्देश आहे. काम करण्याची मानसिकता आणि कामात आनंद येत असला तर कुठलीही जबाबदारी पेलणे कठीण नाही.
प्रमोद वानखेडे,
मुख्याध्यापक