भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण
By नरेश डोंगरे | Published: December 3, 2023 09:25 PM2023-12-03T21:25:08+5:302023-12-03T21:33:25+5:30
मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे ४४ वर्षे : मंदिराच्या आतबाहेर आकर्षक सजावट : हजारो भाविकांची उपस्थिती
नागपूर: सुवर्ण झळाळीने लखलखणारे मंदिरातील सिंहासन अन् त्यावर मखमली शाल लपेटून असलेली साईबाबांची मूर्ती, संपूर्ण मंदिराची करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि मंदिराच्या आतबाहेर बाबांचा गजर करणारे शेकडो भाविक अशा भक्तिपूर्ण वातावरणात रविवारी सायंकाळी श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीपासून तयार करण्यात आलेला बुंदीचा लाडू अर्पण करण्यात आला. निमित्त होते बाबांच्या मूर्ती स्थापनेला ४४ वर्षे पूर्ण झाल्याचे!
प्रतिशिर्डी म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्धा मार्गावरील श्री साईबाबा मंदिरात आजच्या तारखेला अर्थात ३ डिसेंबरला साईबाबांची मूर्ती बसविण्यात आली होती. त्याला आज ४४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त श्री साईबाबा सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या आत आणि बाहेरचा परिसर अत्यंत आकर्षक स्वरूपात सजविण्यात आला आहे. बाबांना आज ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण केला जाणार असल्याचे मंडळाकडून आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार मंदिरात रविवारी सायंकाळी शेकडो भाविकांनी एकच गर्दी केली. सायंकाळी साईबाबांचे निस्सीम भक्त आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयबाबा कोंड्रा यांच्या हस्ते बाबांना हा लाडू अर्पण करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सचिव अविनाश शेगावकर, कोषाध्यक्ष राजेंद्र देशमुख, विश्वस्त राजेंद्र दांडेकर, प्रताप रणवरे, माजी अध्यक्ष विजय भोयर तसेच हजारो साईभक्त उपस्थित होते. भाविकांसाठी नंतर महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली. भाविकांनी साईदर्शन, प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी मंडळातर्फे करण्यात आले.