दीक्षाभूमीबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता
By admin | Published: April 5, 2015 02:31 AM2015-04-05T02:31:17+5:302015-04-05T02:31:17+5:30
कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत नगर विकास विभागाचे अधिकारी
नागपूर : कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत नगर विकास विभागाचे अधिकारी उदासीन असून टाळाटाळ करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्धधम्माची दीक्षा घेऊन ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवून आले. ते ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी होय. दीक्षाभूमीवर आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे आहे. जगभरातील लोकांसाठी हे ठिकाण ऊर्जेचे केंद्र बनले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी २१ मे २०१३ रोजी दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी यासंबंधात शासनाला शिफारससुद्धा केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख यांनी विधानसभेत व परिषदेत यासंबंधात प्रश्न उपस्थित केला होता. १० डिसेंबर २०१३ रोजी हिवाळी अधिवेशनात यासंबंधीच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर देतांना दीक्षाभूमीला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. यापार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने कुठली कारवाई केली, याची माहिती दडवे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारली तेव्हा नगर विकास विभागातर्फे कक्ष अधिकारी व जन माहिती अधिकारी राजेश पाध्ये यांनी यासंबंधात कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ११ आॅगस्ट २०१४ चे पत्र कार्यालयास प्राप्त झालेच नसल्याचेही सांगितले. एकूणच अधिकारी हे या प्रकरणाबाबत उदासीन असून टाळाटाळ करीत आहेत. (प्रतिनिधी)