नागपुरात रेती तस्करीत अधिकाऱ्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:17 AM2018-10-01T10:17:55+5:302018-10-01T10:21:23+5:30

पोलिसांनी शुक्रवारी रेती जप्तीची धडक कारवाई केल्यानंतर रेती तस्करीशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Officers involves in sand trafficking in Nagpur | नागपुरात रेती तस्करीत अधिकाऱ्यांची साथ

नागपुरात रेती तस्करीत अधिकाऱ्यांची साथ

Next
ठळक मुद्देदलालांच्या माध्यमातून बांधले अनेकांचे हातराज्याचा महसूल बुडतोय

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी शुक्रवारी रेती जप्तीची धडक कारवाई केल्यानंतर रेती तस्करीशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या रेती माफियांनी दलालांच्या माध्यमातून प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचेही हात बांधल्याची माहिती पुढे आली आहे. माफियांना प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांचे पाठबळ असल्याची माहिती चर्चेला आल्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
नागपुरात गेल्या अनेक वर्षांपासून रेती तस्करी बिनबोभाट सुरू आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट वृत्तीच्या मंडळींची साथ घेऊन रेती माफिया एकीकडे खनिज संपत्तीची लूट करीत आहेत, दुसरीकडे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवीत आहेत. घाटावरून एका रात्रीतून शंभरावर ट्रक रेती नागपूर आणि आजूबाजूच्या शहरात आणली जात आहे. कारवाईचा अधिकार असलेल्यांपैकी काही जणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे तस्कर कमालीचे निर्ढावले आहेत. त्याचमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला चोरलेली रेती साठवून ठेवण्याचा निर्ढावलेपणा ते दाखवत आहेत. येथे अभिनाश कुमार पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी तस्करांच्या मुसक्या आवळून रेती तस्करीला आळा घातला होता. डॉ. आरती सिंह पोलीस अधीक्षक असताना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही नागपूर जिल्ह्यात तस्करांची नाकेबंदी केली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी रेती तस्करांनी खापरखेडा परिसरात कारवाईसाठी गेलेल्या मंगेश शिंदे नामक डीवायएसपीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी आक्रमक होऊन रेती माफियांवर मोक्कासारखी कडक कारवाई केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले होते. त्यांनी नंतर आपली पद्धत बदलवून चोरून लपून तस्करी सुरू केली होती. अलीकडे त्यांनी दलालांच्या माध्यमातून आरटीओ, पोलीस आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट मंडळींना हाताशी धरले आहे. त्यांचे पाठबळ मिळाल्याने माफियांकडून बिनबोभाट रेतीची तस्करी सुरू आहे. बदल्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना दलालाच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची देण मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या हातात लाखो रुपये कोंबून रेती माफिया ‘ओव्हरलोड’ रेती तस्करी करून शासनाला कोट्यवधींचा फटका देत आहेत.

कारवाईसाठी मंथन
पोलिसांनी आरटीओ आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत ठेवून संयुक्तपणे शुक्रवारी आणि शनिवारी कारवाई करून घेतली. शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालक आणि वाहकांची प्राथमिक चौकशी केली असता ते रेती तस्करीत गुंतलेल्यांच्या इशाऱ्यांवर केवळ रेतीची ने-आण करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती ध्यानात घेत त्यांना पोलिसांनी सोडून दिले. मात्र, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या रेती माफियांसोबत कुणा-कुणाचे लागेबांधे आहे, त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्यावर कोणती आणि कशा प्रकारे कारवाई करता येईल, त्याबाबत मंथन केले जात आहे. सोबतच रेती तस्करीला आळा घालण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून काय कारवाई होते, त्याकडेही लक्ष असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे.

खापा आणि गडचिरोलीतून आणली जाते रेती
सध्या सर्वाधिक रेती खापा परिसरातून तसेच गडचिरोली जिल्ह्यातील घाटांमधून नागपूर जिल्ह्यात येत आहे. ही माहिती कळल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने आणि सहकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी २८ सप्टेंबरला पहाटे ५ वाजतापासून कारवाईचा धडाका लावला. हुडकेश्वरमध्ये रेतीने भरलेले १३ ट्रक पकडले. या कारवाईनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. रेती माफियांनी दलालांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागातील अनेकांचे लाचेच्या रूपाने हात बांधल्याची माहिती पुढे आली. ओव्हरलोडचे काम सांभाळणाºया आदिल, अन्नू नामक दलालाकडून तस्करांना कारवाई न करण्याची हमी मिळाल्याने माफियांनी एका ट्रक्कमध्ये चक्क २८ ते ३० टन रेतीची वाहतूक चालवली आहे. रात्रीच्या वेळी घाटावरून चोरून आणलेली लाखोंची रेती दिघोरी-उमरेड मार्गावर आणि अन्य काही भागातील शेतात साठवून ठेवत आहे. त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान, शनिवारी रस्त्याच्या दुतर्फा साठवून ठेवलेली ४५ ब्रास रेती (सुमारे १५ ते २० ट्रक रेती) पोलिसांनी जप्त केली. ही सर्व रेती जेसीबी लावून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. ती कुणाची आहे, त्याची चौकशी सुरू झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Officers involves in sand trafficking in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.