आयुक्तांसह अधिकारी सायकलने पोहोचले महापालिका कार्यालयात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:23+5:302021-01-03T04:09:23+5:30
नागपूर : पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी सायकलीने महापालिका कार्यालयात पोहोचले. आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि ...
नागपूर : पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी सायकलीने महापालिका कार्यालयात पोहोचले. आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हरित शपथ देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प केला.
शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायकलने कार्यालयात येण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शासकीय निवासस्थान तपस्यापासून महापालिका कार्यालयापर्यंत सायकलीने प्रवास केला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत नऊ किलोमीटरचा प्रवास सायकलीने केला.
या अभियानात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, साहाय्यक आयुक्त महेश धामेचा, स्वास्थ्य अधिकारी व उपायुक्त (घनकचरा प्रबंधन) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बनर्जी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, साहाय्यक आयुक्त विजय हुमणे, अतिरिक्त साहाय्यक स्वास्थ्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडाधिकारी पीयूष आंबुलकर, उपद्रव शोध पथकाचे (एनडीएस) प्रमुख वीरसेन तांबे, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक शील घुले, राहुल पांडे, प्रणिता उमरेडकर, झोन-२ मधील सफाई कामगार सायकल खेळाडू दिलीप भरत मलिक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सायकलीने कार्यालयात आले.