नागपुरात नगरसेवकांच्या नावावर अधिकाऱ्याची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:19 PM2018-01-15T23:19:58+5:302018-01-15T23:23:16+5:30
नगरसेवक विजय चुटेले यांच्या नावावर एका कार शोरुमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धंतोली झोनमधील सहायक अभियंता श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ मात्र, फक्त बदली करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरसेवक विजय चुटेले यांच्या नावावर एका कार शोरुमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धंतोली झोनमधील सहायक अभियंता श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ मात्र, फक्त बदली करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अतिक्रमणाच्या नावावर शहरातील दुकानदारांकडून वसुली करण्याचा सपाटाच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे़ परंतु अतिक्र मण कारवाई होईल या धास्तीने व्यावसायिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने महापालिका प्रशासनाला संबंधितावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे काही अधिकारी सर्रास वसुलीच्या मागे लागले आहेत. आता तर नगरसेवकाच्या नावावर वसुली करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे़ बुधवारी १० जानेवारीला धंतोली झोनचे सहायक अभियंता श्याम धरममाळी आणि सफाई कर्मचारी संजय लुडेरकर हे दोघे ग्रेट नागरोडवरील आर्या कारच्या शोरुममध्ये गेले होते. त्यांनी नगरसेवक विजय चुटेले यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले़ ही बाब स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक बाल्या बोरकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी चुटेले यांना यासंदर्भात विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. थोड्याच वेळात दोघेही भाजपा कार्यकर्त्यांसह धंतोली झोन कार्यालयात दाखल झाले. झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांना लेखी निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली होती तसेच धरममाळी यांची जुनी प्रकरणेही निदर्शनास आणली़ याची दखल घेत व अखेर महापालिका प्रशासनाने श्याम धरममाळी यांची आसीनगर झोनमध्ये उचलबांगडी केली आहे़ मात्र कठोर कारवाई न करता बदलीची कारवाई करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची महापालिकेत चर्चा आहे.
महापौरांकडे तक्रार
शोरुमच्या कर्मचाऱ्यांकडे नगरसेवकांच्या नावावर पैशाची मागणी करणाऱ्याअधिकाऱ्याची महापौर नंदा जिचकार यांच्याकडे तक्रार केली आहे. अशा प्रकारामुळे महापालिका व नगरसेवकांची बदनामी होत आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विजय चुटेले यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.