अधिकाऱ्याचे आत्महत्या प्रकरण : ‘ब्लॅकमेलर’ पोलीस निरीक्षक दुर्गे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 11:31 PM2021-03-16T23:31:55+5:302021-03-16T23:32:59+5:30
Officer's suicide case, crime news आत्महत्येच्या प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आणि मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ब्लॅकमेलर टोळीतील पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांना आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आत्महत्येच्या प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आणि मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ब्लॅकमेलर टोळीतील पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांना आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले. याच प्रकरणातील ब्लॅकमेलर आरोपी नीता मानकर- खेडकर, तिची मुलगी, तिचा भाऊ दादा मानकर आणि निलंबित पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांचा ठाणे पोलीस जागोजागी शोध घेत आहेत.
आरोपी नीता मानकर हिचे सचिन चोखोबा साबळे (वय ३८, मुंबई) नामक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. ते कळाल्याने एसटीत ड्रायव्हर असलेल्या नीताच्या नवऱ्याने डिसेंबर २०२० मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचे भांडवल करून यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणात नीताशी संगनमत करून सचिन साबळेंना ब्लॅकमेल करणे सुरू केले. प्रारंभी मासुरकर नामक व्यक्तीच्या माध्यमातून तत्कालीन ठाणेदार दुर्गेने साडेचार लाख रुपये हडपले. तर, यातील एकही पैसा आम्हाला मिळाला नाही, असे सांगून तपास अधिकारी दीपक चव्हाणने नंतर दोन लाख उकळले. नंतर याच भामट्याने पुन्हा नवीन ठाणेदार अशोक मेश्रामच्या नावाने तीन लाखांची खंडणी मागितली. हे भामटे पैशासाठी छळत असताना आरोपी नीताने साबळेंमागे लग्नासाठी तगादा लावला. तिची मुलगी आणि भाऊ दादा मानकर यानेही साबळेंवर प्रचंड दडपण आणले. चोहोबाजुने कोंडी झाल्यामुळे १८ फेब्रुवारीला साबळेंनी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या डायरीतून ब्लॅकमेलिंगचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी साबळेंच्या आत्महत्येला कारणीभूत असलेली नीता, तिची मुलगी, भाऊ दादा मानकर, पीएसआय दीपक चव्हाण, तत्कालीन ठाणेदार दुर्गे आणि मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आल्याबरोबर पोलीस आयुक्तांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले. तर, साडेचार लाख रुपये हडपणारे रमाकांत दुर्गे यांना विचारविमर्श केल्यानंतर आज निलंबित करण्यात आले. तिकडे अन्य आरोपींना शोधण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक जागोजागी छापेमारी करत आहे.
मेश्राम यांना अटकपूर्व जामीन
साबळेंकडे भरपूर पैसा असल्याने बदनामीच्या धाकाने ते आणखी रक्कम देतील, असा अंदाज बांधून उपनिरीक्षक चव्हाणने पुन्हा तीन लाखांच्या खंडणीसाठी मेश्रामचे नाव पुढे केले होते. त्यामुळे साबळेने आत्महत्या करण्यापूर्वी मेश्रामच्याही नावाचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला. परिणामी ठाणे पोलिसांनी मेश्राम यांनाही आरोपी बनविले. या पार्श्वभूमीवर, मेश्राम यांच्यावतीने ॲड. समीर सोनवणे यांनी युक्तिवाद करून आज न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला.