‘रंगीत पार्ट्या’तील क्लीपने अधिकाऱ्यांची कोंडी; देना बँक प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:28 AM2018-06-22T10:28:12+5:302018-06-22T10:28:20+5:30
बँकेत ठेवलेले सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये बनावट कागदपत्रांच्या आधारे झटक्यात काढून घेणाऱ्या टोळींचे अनेक किस्से आता चर्चेला आहेत.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेत ठेवलेले सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये बनावट कागदपत्रांच्या आधारे झटक्यात काढून घेणाऱ्या टोळींचे अनेक किस्से आता चर्चेला आहेत. या टोळीत सूत्रधारांची भूमिका वठविणाऱ्या सुटाबुटातील दलालांनी बँक अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी ‘रंगीत पार्ट्या’देऊन त्याची आक्षेपार्ह क्लीप तयार केली. त्याआधारे संबंधितांना ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक माहिती चर्चेला आली आहे.
आक्षेपार्ह क्लीप आणि ब्लॅकमेलचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर पोलिसांनीही त्याकडे लक्ष वेधले असून, चौकशी सुरू झाल्यामुळे लवकरच या गैरप्रकारातील अनेक धक्कादायक किस्से उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या गैरप्रकारात गुंतलेल्या सनदी लेखापालांकडे पोलिसांसह सर्वच क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे. अवघ्या तीन वर्षात एकट्या देना बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कर्ज प्रकरणे सादर करून बँकेला ९४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. यापैकी दोन प्रकरणात तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने वेगवेगळे गुन्हे दाखल केले. यातील पहिल्या गृहकर्जाच्या प्रकरणात ११ आरोपींचा समावेश असून, त्यातील फसवणुकीची रक्कम व्याजासह ३ कोटी ४६ लाख ५५ हजार आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात आरोपींची संख्या पाच असून, कर्जाची रक्कम दोन कोटी रुपये आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, पहिल्या प्रकरणात आरोपी सतीश वाघ तर दुसऱ्या प्रकरणात आरोपी दिलीप कलेले आणि समीर चट्टे या मामा-भाच्याची जोडगोळी सूत्रधार आहे. असे असले तरी या आणि अन्य प्रकरणाच्या बनवाबनवीत खरे सूत्रधार सनदी लेखापाल (सीए) एस. एम. कोठावाला अॅन्ड असोसिएटस् आणि अजय अॅन्ड अमर असोसिएट्स (अजय आणि अमर अग्रवाल) हे असावेत, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यातील कोठावाला फर्मविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, कागदोपत्री मोठमोठ्या ट्रेडिंग कंपनी किंवा व्यावसायिक संस्था दाखवून कागदावरच पहिल्या वर्षी दोन कोटी, दुसऱ्या वर्षी साडेसहा कोटी तर तिसऱ्या वर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल दाखवण्यात या तसेच अन्य काही सीए फर्मची महत्त्वाची भूमिका आहे. बँकेत जमा असलेला सर्वसामान्यांचा पैसा कॅश क्रेडिट किंवा कर्जाच्या रूपाने अशाप्रकारे हडपण्यासाठी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर साम, दामची नीती अवलंबल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रारंभी बँक अधिकाऱ्यांच्या जवळ पोहचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आलिशान कारमध्ये सुटाबुटात फिरणारे दलाल अधिकाऱ्यांना सोनसाखळी, ब्रेसलेट, रोलॅक्सारख्या कंपनीचे दोन ते अडीच लाखांचे घड्याळ अशी महागडी भेटवस्तू(गोल्ड गिफ्ट)च्या रूपात देतात. त्यानंतर त्यांना कर्जाच्या रकमेतील टक्केवारी आॅफर करायची. हे करतानाच नागपुरातील काही आलिशान फार्म हाऊस, हैदराबाद, मुंबईसारख्या मोठ्या महानगरात रंगीत पार्ट्यांचे आयोजन करतात. त्यात श्रमपरिहारानंतरच्या स्थितीतील अधिकाऱ्यांच्या आक्षेपार्ह क्लीप तयार करायच्या आणि नंतर त्याआधारे अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचा, अशी या दलालांची कार्यपद्धत आहे. कोट्यवधींच्या कर्जाला मंजुरी आणि बँक खाते एनपीए झाल्यानंतर सेटलमेंट करणाऱ्या या गुन्हेगारांनी अशाप्रकारे अनेक बँक अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवल्यानेच सर्वसामान्यांचा कोट्यवधींचा निधी या टोळक्यांकडे बिनबोभाट वळता होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा धक्कादायक पैलू चर्चेला आल्यानंतर पोलीस यंत्रणाही अचंबित झाली असून, त्यासंबंधाने चौकशी केली जात आहे. दुसरीकडे या सर्व बनवाबनवीत एस. एम. कोठावाला आणि अजय-अमर अग्रवाल यांची चक्रावून टाकणारी भूमिका चर्चेला आल्याने पोलिसांसह सर्वच क्षेत्राचे लक्ष तिकडे वेधले गेले आहे.