अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, पण तयारी अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:48+5:302021-06-09T04:08:48+5:30
नद्यांची स्वच्छता अजूनही सुरू : तुटलेल्या चेंबरची दुरुस्ती नाही : पावसाळी नाल्या सफाईकडे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
नद्यांची स्वच्छता अजूनही सुरू : तुटलेल्या चेंबरची दुरुस्ती नाही : पावसाळी नाल्या सफाईकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळा विचारात घेता मनपा प्रशासनाने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. केंद्रीय कार्यालयातील अग्निशमन विभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. परंतु अजूनही शहरातील नद्यांची स्वच्छता १० टक्के शिल्लक असल्याची माहिती आहे. तर शहरातील नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केला आहे. दुसरीकडे पावसाळी नाल्याची सफाई करण्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. नादुरुस्त चेंबर दुरुस्त करण्यात आलेले नाही. ठिकठिकाणी तुटलेल्या चेंबरवरील झाकणे अद्याप बदलण्यात आलेली नाही.
वाहनचालकांना त्रास होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्याची दुरुस्ती केली जाते. वर्ष २०१३-१४ शहरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी मोरभवनसह आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता. त्यानंतर दोन वर्षात जोराचा पाऊस झाल्याने मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाला होता. सिवरेज लाईनवर झाकण नसल्याने लहान मुलगा वाहून गेल्याची घटना घडली होती. परंतु यातून मनपा प्रशासनाने बोध घेतलेला दिसत नाही.
विशेष म्हणजे, शहरातील आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इन्सिडंट कमांडर म्हणून अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्यावर सोपविली आहे. या प्रणालीचे नियोजन विभागप्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत. त्यांच्या नियंत्रणात रिस्पॉन्स ब्रँच हेड कार्यरत राहतील. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी प्रत्येकी दिवसासाठी एक-एक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
......
२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत
पावसाळ्यात शहरात होणाऱ्या नुकसानीची माहिती मिळावी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी मनपाने अग्निशमन विभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहील. नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी दोन-तीन पाळीत उपलब्ध राहतील. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२९, ०७१२-२५६७७७७ आहे. आपत्कालीन कक्ष, सिव्हिल मुख्यालय अग्निशमन केंद्र येथील दूरध्वनी क्र. ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ७०३०९७२२०० हा आहे.