ंगॅस एजन्सींवर अधिकारी नाराज
By admin | Published: April 2, 2015 02:43 AM2015-04-02T02:43:04+5:302015-04-02T02:43:04+5:30
गॅस कंपन्यांचे अधिकारी आणि ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गॅस एजन्सींतर्फे देण्यात येणाऱ्या...
नागपूर : गॅस कंपन्यांचे अधिकारी आणि ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गॅस एजन्सींतर्फे देण्यात येणाऱ्या निकृष्ट ग्राहक सेवेवर जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहक सेवा सुधारा, अन्यथा एजन्सी रद्द करू, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.
अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी यांनी लोकमतला सांगितले की, ग्राहकांना सबसिडीचे सिलिंडर ७१० रुपयांत मिळत आहे. पण केंद्र सरकारच्या दरनिश्चितीनुसार हे सिलिंडर ग्राहकाला ७०१.५० रुपयांत मिळायला हवे.
याशिवाय शहरातील तिन्ही कंपन्यांच्या एजन्सीचे संचालक ग्राहकांना घरपोच सिलिंडर न देता गोडावूनमधून घ्यायला सांगतात. अशा स्थितीत वाहन खर्चाचे १८ रुपये कमी न करता ग्राहकांना पूर्ण किमतीत सिलिंडर घ्यावे लागते. राज्य सरकारसुद्धा सिलिंडरच्या किमतीवर ३० रुपये व्हॅट आकारते. सिलिंडरची किंमत, वाहन खर्च आणि व्हॅट याचा विचार केल्यास ग्राहकांकडून अनावश्यक ५६.५० रुपये वसूल करण्यात येत आहेत. यावर गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी तिवारी यांनी बैठकीत केली. (प्रतिनिधी)
एजन्सी रद्द करा
रेशीमबाग येथील सारंग गॅस एजन्सी आणि काँग्रेसनगर येथील भेंडे गॅस एजन्सी बहुतांश ग्राहकांना घरपोच सिलिंडर देता गोडावूनमधून घेण्याचे आदेश देतात. नाईलाजास्तव ग्राहकसुद्धा गोडावूनमधून सिलिंडरची उचल करतात. या एजन्सी वाहन खर्चाचे १८ रुपये कमी करीत नाहीत. यासंदर्भात इंडियन गॅसचे क्षेत्रीय अधिकारी निपाणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही ते जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. ग्राहकांना परिपूर्ण सेवा न देणाऱ्या दोन्ही एजन्सीचा परवाना रद्द करावा आणि अधिकारी निपाणे यांना निलंबित करावे, अशी मागणी देवेंद्र तिवारी यांनी बैठकीत केली.