अधिकाऱ्यांनी आयकर कायद्याची
By admin | Published: January 12, 2016 03:04 AM2016-01-12T03:04:21+5:302016-01-12T03:04:21+5:30
भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) ही देशातील महत्त्वाची सेवा असून या विभागात ७६ हजार अधिकारी कार्यरत आहेत.
अंमलबजावणी काटेकोरपणे करावी
अरुणकुमार जैन यांचे आवाहन : भारतीय महसूल सेवेतील ६९ व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन
नागपूर : भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) ही देशातील महत्त्वाची सेवा असून या विभागात ७६ हजार अधिकारी कार्यरत आहेत. जागतिकीकरणाच्या व खाजगीकरणाच्या युगात करदाते हे राष्ट्रनिर्माणामध्ये भागीदार असतात. त्यामुळे आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजाविताना मूलभूत अशा आयकर कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे आवाहन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष अरुणकुमार जैन यांनी येथे केले.(प्रतिनिधी)
करदात्यांना पारदर्शक सेवा द्याव्यात
अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान जी गोष्ट शिकविली जाईल, त्याचा प्रत्यक्ष अनुभव काम करताना महत्त्वाचा ठरणार आहे. करदात्यांना विश्वासात घेऊन अधिकाधिक कर गोळा करावा. धोरण राबवून वाद टाळा, कायद्याच्या चौकटीत काम करा आणि सौहार्दाचे वातावरण ठेवून करदात्यांना पारदर्शक व उत्तम सेवा द्या, असा सल्ला जैन यांनी अधिकाऱ्यांना दिला. गोळा होणाऱ्या आयकरावर देशाचा पायाभूत विकास अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गुंजन मिश्र म्हणाले, प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांना करदात्यांची संख्या वाढविण्याची तसेच करदात्यांना अनुकूल अशा सेवा-सुविधा प्रदान करण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
ई-फायलिंग, इ-हिअरिंग उपक्रम
भारतीय महसूल सेवेच्या ६९ व्या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जैन यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे सोमवारी झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अधिकाऱ्यांनी कायद्याचे कार्यक्षमतेने पालन करून करदात्यांना सुविधा प्राप्त करून द्याव्यात. आयकर खात्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केल्यामुळे ई-फायलिंग, इ-हिअरिंग सारखे उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्या जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या समारंभाला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या महासंचालक गुंजन मिश्र, अपर महासंचालक-१ (प्रशिक्षण) मदनेशकुमार मिश्रा, अपर महासंचालक-२ (प्रशिक्षण) लीना श्रीवास्तव, अपर महासंचालक-३ (प्रशिक्षण) श्रीप्रकाश दुबे, सहयोगी कोर्स संचालक-१ (प्रशिक्षण) संजयकुमार आणि सहयोगी कोर्स संंचालक-२ (प्रशिक्षण) श्रीनिवासुक उपस्थित होते.
बॅचमध्ये १६८ प्रशिक्षणार्थी अधिकारी
भारतीय महसूल सेवेच्या ६९ व्या तुकडीत २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १६७ प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. त्यात दोन अधिकारी रॉयल भूतान सेवेतील आहेत. बॅचमध्ये २६ टक्के महिला असून सर्वाधिक अधिकारी उत्तर प्रदेशचे आहेत. त्यानंतर राजस्थान आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. एकूण अधिकाऱ्यांमध्ये २१ टक्के ग्रामीण भागातून, २४ टक्के मेट्रो आणि ५४ टक्के शहरी भागातील आहेत. ६२ टक्के अधिकारी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. या बॅचमध्ये २५ डॉक्टर आणि ३० टक्के पदव्युत्तर आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी १६ महिन्यांचा आहे. एप्रिल २०१७ पासून ते सहायक आयुक्त म्हणून विविध राज्यात कार्यरत होतील. या समारंभात मुख्य आयकर अधिकारी सुखदेव चरण, आयकर आयुक्त आणि ६८ व्या बॅचचे अधिकारी उपस्थित होते.