लाड-पागे भरतीत अधिकारी घेतात लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:58 AM2018-04-24T00:58:07+5:302018-04-24T00:58:19+5:30
महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विधी समितीचे सभापती अॅड. धरमपाल मेश्राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विधी समितीचे सभापती अॅड. धरमपाल मेश्राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
एखाद्या सफाई कर्मचाऱ्याने आपल्या विवाहित मुलीला वारस बनवून नोकरी देण्याबाबत पत्र दिल्यास, वारस असलेल्या मुलीला आपल्या पालकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारत असल्याबाबतचे शपथपत्र द्यावे लागते. त्यानंतर संबंधित वारस असलेल्यांना नोकरीत समावून घ्यावे लागते. अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात आहे. परंतु आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार व लाड-पागे समितीचे कामकाज बघणारे राजेश लव्हारे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाऐवजी संबंधितांना लाड- पागे समितीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या परिपत्रकानुसार भरती करतात. अनेक प्रकरणात या विभागाच्या परिपत्रकातील तरतुदी सांगून पात्र उमेदवारांना डावलण्यात येते. लव्हारे यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. यात दासरवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला.
सभागृहात २० एप्रिलला लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीचा प्रश्न निकाली निघाला आहे. असे असतानाही परिपत्रातील तरतुदीचे कारण पुढे करून संभ्रम निर्माण केला जात आहे. हा प्रकार योग्य नाही. सामान्य प्रशासन विभागामार्फत नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे या विभागाचे परिपत्रक ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी मेश्राम यांनी केली.