गुगुलडाेहमध्ये सुनावणीस आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले; सर्वपक्षीय नेतेही विराेधात
By निशांत वानखेडे | Published: July 10, 2023 06:59 PM2023-07-10T18:59:10+5:302023-07-10T18:59:35+5:30
Nagpur News चिमूटभर राेजगारासाठी वनसंपदा नष्ट हाेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी अक्षरश: अधिकाऱ्यांना जनसुनावणीतून हुसकावून लावले. त्यामुळे ही जनसुनावणी गाेंधळातच गुंडाळून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.
निशांत वानखेडे
नागपूर : गुगुलडाेहच्या जंगलात आधी मॅगनीज खाणी सुरू करण्याला मंजुरी दिल्यानंतर जनसुनावणी घेण्यास आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या प्रचंड विराेधाचा सामना करावा लागला. चिमूटभर राेजगारासाठी वनसंपदा नष्ट हाेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी अक्षरश: अधिकाऱ्यांना सुनावणीतून हुसकावून लावले. त्यामुळे ही जनसुनावणी गाेंधळातच गुंडाळून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.
रामटेक तालुक्यातील गुगुलडोह येथील जंगलात १०५ हेक्टरमध्ये एका खासगी कंपनीला मॅगनीज खदान सुरु करण्याचा ठेका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे जंगल पेंच व्याघ्र प्रकल्प व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जाेडणाऱ्या काॅरिडाॅरचा भाग असून या प्रकल्पात जंगलातील २ लाखाच्यावर झाडांची कटाई हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील जलस्राेत, चारा आणि वन्यप्राण्यांच्या अधिवासावर विपरित परिणाम हाेणार असल्याने पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांनीही या प्रकल्पाला कडाडून विराेध केला आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींनीही ग्रामस्थांची साथ देत प्रकल्पाला विराेध केला आहे. याची प्रचिती साेमवारी एमपीसीबीतर्फे गुगुलडाेह येथे आयाेजित जनसुनावणीतून दिसून आली. स्थानिक नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध करीत गोंधळ घातला. त्यामुळे जनसुनावणी पुर्ण होवू शकली नाही.