ऑनलाईन दीक्षांतला राज्यपालांची ऑफलाईन उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:07+5:302021-07-05T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. ९ जुलै रोजी होणाऱ्या या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भूषविणार आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका नागपूर विद्यापीठालादेखील बसला. ११ एप्रिल रोजी नियोजित विशेष दीक्षांत समारंभ व २३ एप्रिल रोजीचा १०८वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला. विद्यापीठाने आता ९ जुलै रोजी ऑनलाईन दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ९ जुलै रोजी विद्यापीठाच्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दीक्षांत सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्याशाखांचे अधिष्ठाता मंचावर उपस्थित राहतील. कोरोनाच्या निर्बंधांमुळे ५० लोकांचीच प्रत्यक्ष उपस्थिती राहणार आहे.
विद्यार्थ्यांचा हिरमोड
दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात येतो. मात्र, यंदा निर्बंधांमुळे गुणवंतांनादेखील प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाच्या एक किंवा दोन दिवसांनी दीक्षांत सभागृहात बोलावून पदके व पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
कुलगुरू-प्र - कुलगुरूंचा ठरणार पहिला दीक्षांत समारंभ
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ ठरणार आहे. कोरोनाच्या काळातच दोघांचीही पदावर नियुक्ती झाली व त्यांचा पहिलाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन राहणार आहे.