अरे बचाव कितना बचाते हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:46+5:302021-07-14T04:10:46+5:30

- लॉकडाऊनमध्ये कॉस्ट कटिंगचे चलन : किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामधील लॉकडाऊन सुरू ...

Oh, how much you save! | अरे बचाव कितना बचाते हो!

अरे बचाव कितना बचाते हो!

Next

- लॉकडाऊनमध्ये कॉस्ट कटिंगचे चलन : किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामधील लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीचे कुटुंबातील एकत्रित उत्पन्न लॉकडाऊन, बेरोजगारीमुळे निम्म्यावर आले. परिणामी अनेक कुटुंबांनी त्यांच्या दैनंदिनीतील अनावश्यक खर्च बंद केले, तर आवश्यक खर्चात कपात केली. मात्र, महागाईच्या भस्मासुराने होती-नव्हती सगळी बचत खल्लास केली.

‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेक कुटुंबीयांनी आपला मासिक खर्च ५० टक्केपर्यंत कमी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अनावश्यक खर्चामध्ये हॉटेलमध्ये जेवणे, सहली रद्द करणे, सुपरशॉप-मॉल्समध्ये जाऊन खरेदी करणे, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, महागडे कपडे खरेदी करण्यास टाळणे, दोनपेक्षा जास्त वृत्तपत्रे दररोज घेणाऱ्यांनी एकच वृत्तपत्र घेणे, एक लिटर दुधाऐवजी अर्धा लिटर दूध घेणे असे उपाय योजले आहेत. अनेकांनी वाहन सर्व्हिसिंगसह कटिंगपर्यंत पैसा वाचविण्यावर भर देत, ही कामे सेल्फ सर्व्हिसमध्ये रूपांतरित केली. स्वयंपाकघरात चटर-पटर व्यंजने टाळण्याचाही अनेकांचा प्रयत्न आहे. कोरोना संक्रमणात आहारविषयक जनजागृतीमुळेही हा निर्णय अनेकांनी घेतला. त्यात आरोग्यवर्धक आहारावर भर देऊन खर्चकपात केली जात आहे.

उत्पन्नाचे स्रोत घटले

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाला, तर कुणाची पगार कपात झाली. ज्यांच्या घरात महिनेवारी ४०-५० हजार रुपये आर्थिक उत्पन्न होत होते, त्यांचे उत्पन्न या काळात निम्म्यावर आले, तर अनेकांचे उत्पन्न अस्थिर झाले. त्याचा परिणाम नाइलाजाने अनेक कुटुंबांना खर्च कपात करावीच लागली.

बचत महामागाईने खाल्ली

याच दरम्यान विजेचे दर वाढले, पेट्रोल-डिझेलचे दर दरोज उच्चांक गाठत आहेत, स्वयंपाकाचा सिलिंडर महागला, खाद्यतेलाचे दर दुपटीने वाढले. या सर्वांचा परिणाम कोरोनाने शिकवलेली आणि नागरिकांनी केलेली बचत महागाईच्या घशात गेली. बचत करून करून किती करायची आणि खर्च करून करून किती कमी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्यमवर्गाचे वर्तमान कोरोनात घुसले, भविष्य अंधातरी

मध्यमवर्गीयांची स्वप्ने अत्यंत सामान्य असतात. सर्वसाधारण नोकरी, उत्तम पगार, कुटुंबीयांच्या मिजाशी, एक हक्काचे घर, एक दुचाकी आणि एक कार आणि मुलांचे उत्तम शिक्षण... यासाठी एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर खस्ता खात असतो. बरेचदा घरातील महिलाही काहीना काही उत्पन्नाची साधने जोडत असते. मात्र, कोरोनात स्वप्नांचा पार चुराडा झाला. वर्तमान ढासळले. महागाईचा सामना करताना वर्तमान सावरण्याचा प्रश्न सगळ्यांपुढे आहे आणि त्यामुळे भविष्य अधांतरी गेले आहे.

लॉकडाऊन, महागाईचा दुहेरी मार

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, व्यवसाय बुडाला ही कारणे आहेत. बचतीचा मार्ग म्हणून प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करतो आहे. त्याचा परिणाम बाजारात गर्दी दिसत असली, तरी अत्यावश्यक खरेदीसाठीच. चैनीचा व्यापार इतक्यात तरी उभारण्याची चिन्हे नाहीत. हॉटेल, कापड, सहली, थिएटर्स, कलावंत यांना या गोष्टीचा फटका बसतो आहे.

कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग?

* गेल्या १६-१७ महिन्यांपासून घराबाहेर पडणे नाही की कोणत्या उत्सवात जाणे नाही. त्यामुळे, दर महिना-दोन महिन्यात घ्यावी लागणारी वस्त्रप्रावरणे, अत्यावश्यक वगळता खरेदी करण्यास टाळले. त्यामुळे एक चांगल्या रकमेची बचत झाली. अडचणीच्या काळात ही रक्कम उपयोगी पडल्याचे एका कुटुंब प्रमुखाने सांगितले.

* सर्वसामान्य मध्यमवर्गीय म्हणून महिन्यात एक वेळ कुटुंबासोबत हॉटेलमध्ये जेवणे होतेच आणि मित्रांसोबतच एक-दोन पार्टी होतच असते. व्यवसाय बुडाल्याने आपसुकच या सवयींवर निर्बंध आले. पैसा वाचवणे गरजेचे आहे, ही गोष्ट ध्यानात आल्याचा अनुभव एका व्यावसायिकाने व्यक्त केला.

* वीकेंड ट्रिपची सवय आमच्या ग्रुपला आहे. प्रत्येक दोन आठवड्यानंतर किंवा महिन्यातून एकदा अशा सहली नजीकच्या स्थळांवर काढत असतो. निसर्गपर्यटन आणि मित्रांचा सहवास, हा महत्त्वाचा असतो. मात्र, लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने सहलींना आवरते घेतले आहे. बचत महत्त्वाची असल्याचे एका आयटी क्षेत्रातील तरुणाने सांगितले.

* व्यसन कुठलेच नसले तरी फिरायला जाणे, नाटक-सिनेमा बघणे, चटर-पटर खाण्याची भारी हौस. लॉकडाऊनमध्ये माझ्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाची चाके थांबली. पैसाच येईना. त्यामुळे सगळ्या सवयींना आवरते घेतले आहे. पैसा या काळात नाही तर कुठे वाचवणार, अशी भावना एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने व्यक्त केली.

* लाँग टूर हा आवडीचा छंद. मात्र, महागाई वाढली आणि उत्पन्नाची साधने आखडली असल्याने हा छंद तूर्तास थांबला असल्याचे एका पर्यटनप्रिय तरुणाने सांगितले.

....................

Web Title: Oh, how much you save!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.