अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:16 AM2020-08-04T10:16:42+5:302020-08-04T10:21:07+5:30

कर्तव्यावर असलेल्या एका सिस्टरने नागपुरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भावनिक आधार देत ‘मीच तुमची रक्षक, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ’ असल्याचे स्पष्ट केले आणि प्रत्येकाला रक्षासूत्र बांधून त्यांना एका उदात्त बंधनात बांधून घेतले.

Oh, I am your sister and I am your brother! | अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ!

अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ!

Next
ठळक मुद्देमेडिकलचे कोविड सेंटरही गहिवरलेसिस्टरने रुग्णांना बांधले रक्षासूत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा होतो. तो यंदाही साजरा झाला. जे जवळ होते त्यांच्या भेटी झाल्या अन् जे दूरवर होते त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन हा क्षण साजरा केला. मात्र, कोविड सेंटरमध्ये कोरोनाशी झुंज देत असलेल्या रुग्णांसाठी हा दिवस अतिशय तणावाचा ठरणार असल्याचे लक्षात येताच, तेथेच कर्तव्यावर असलेल्या एका सिस्टरने त्या रुग्णांना भावनिक आधार देत ‘मीच तुमची रक्षक, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ’ असल्याचे स्पष्ट केले आणि प्रत्येकाला रक्षासूत्र बांधून त्यांना एका उदात्त बंधनात बांधून घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या भीतीने यंदा सर्वच मतावलंबीयांच्या सणोत्सवांवर बरेच निर्बंध घातले गेले आहेत. कोणतेच सण, सोहळे सार्वजनिकरीत्या साजरे केले जात नाहीत. नागरिकही हे सगळे निर्बंध कर्तव्यभावनेने पाळत आहेत. मात्र, काही सण सोहळा, जल्लोषाचे नव्हे तर भावनेचे प्रतिबिंब असतात. राखी पौर्णिमा म्हणा वा रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्यातील ऋणानुबंध व्यक्त करणारा आहे. जवळ असणे, दूर असणे हे नित्याचेच. मात्र, यंदा जवळ असो वा दूर सर्वांना चिंता आहे ती सुरक्षेची. त्यामुळेच यंदाचा रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण आहेत आणि संख्या शेकडोने वाढत आहेत.

अशात रुग्णांना हा सण साजरा करता येणार नाही, हे निश्चितच होते. त्यातल्या त्यात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका-परिचारक व अन्य स्टाफलाही विलगीकरणात राहणे भाग पडते आहे. दरदिवशी मनावर येणारा तणाव वेगळाच. अशा स्थितीत मेडिकलच्या कोविड सेंटरमध्ये नर्स स्टाफ म्हणून कर्तव्यावर असलेल्या लक्ष्मीराणी शाहू या बहिणीने वरिष्ठांच्या परवानगीनुसार हा सण रुग्णांसोबतच साजरा करण्याचा निर्धार केला. त्या अनुषंगाने सकाळची शिफ्ट आटोपून लागलीच आरती थाळी, मिठाई अन् प्रत्येकासाठी गिफ्ट आणि दोन आधार देणारे संवेदनेचे शब्द घेऊन लक्ष्मीराणी सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाकडे गेली. त्यात मोठ्या संख्येने मुलेही होते. तरुणही होते अन् ज्येष्ठही होते. विशेष म्हणजे विविध मतावलंबी असलेल्या रुग्णांनीही या बहिणीकडून रक्षासूत्र बांधून घेत स्वत:च्या कर्तव्याची जाणीवही करवून देत होते. काहींनी बहिणीला द्यावयाचा बोजारा टाकला तर काहींनी अश्रू ढाळले. हे दृश्य बघून इतर कर्मचाऱ्यांचे डोळेही पाणावले होते.

भाऊ जवळ असतानाही राखी बांधू शकले नाही - राणीलक्ष्मी शाहू
: कोविड सेंटरमध्ये असल्याने माझे दोन्ही भाऊ नागपुरात असूनदेखील त्यांना राखी बांधू शकत नव्हते. माझी ही स्थिती बघता रुग्णांच्या स्थितीचा अंदाज आला. आमच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे आजचा दिवस अत्यंत विलक्षण ठरल्याची भावना राणीलक्ष्मी शाहू यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

 

Web Title: Oh, I am your sister and I am your brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.