अरेच्चा, साखर न टाकता चहा गाेड कसा झाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2023 08:20 AM2023-01-08T08:20:00+5:302023-01-08T08:20:02+5:30
Nagpur News निसर्गात ‘स्टिव्हीया’ नावाची वनस्पती आहे, जिच्या पानांनी चहा किंवा काेणताही पदार्थ गाेड तर हाेईल, पण त्याचा आराेग्यावर दुष्परिणाम हाेणार नाही, कारण यात गाेडवा तर आहे, पण मधुमेहींना विष ठरणारी कॅलरी नाही.
निशांत वानखेडे
नागपूर : साखर किंवा गुळाशिवाय चहा किंवा काेणत्याही पदार्थात गाेडपणाची कल्पनाच करता येत नाही. हा साखरेचा गाेडवा मधुमेही रुग्णांसाठी मात्र विष ठरते. मात्र निसर्गात ‘स्टिव्हीया’ नावाची वनस्पती आहे, जिच्या पानांनी चहा किंवा काेणताही पदार्थ गाेड तर हाेईल, पण त्याचा आराेग्यावर दुष्परिणाम हाेणार नाही, कारण यात गाेडवा तर आहे, पण मधुमेहींना विष ठरणारी कॅलरी नाही.
सीएसआयआरअंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन बाॅयाेरिर्साेस टेक्नालाॅजी, पालमपूर, हिमाचल प्रदेशच्या संशाेधकांनी ही नैसर्गिक वनस्पती शाेधून काढली आणि येथील शेतकऱ्यांकडून त्याची शेतीही सुरू केली आहे. संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. सुखजिंदर सिंह यांनी सांगितले, स्टिव्हीयाच्या पानांमध्ये लाे-कॅलरीचा ‘स्टिव्हीओल ग्लायकाेसाइड’ हा घटक असताे. परिचित एसजीमध्ये ‘रिबाॅडिओसाइड-ए’ हा महत्त्वाचा घटक नियमित शुक्राेजपेक्षा ३०० पट गाेड असताे. स्टिव्हीयाच्या सुकलेल्या पानांची भुकटी करून ती चहा किंवा इतर पदार्थात वापरली जाऊ शकते. हिमाचल प्रदेशच्या अनेक शेतकऱ्यांनी स्टिव्हीयाची शेती सुरू केली असून, काही उद्याेजकांनी बिस्किटांसह अनेक पदार्थ तयार करून परदेशात निर्यातही सुरू केल्याची माहिती डाॅ. सिंह यांनी दिली. १०८व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसमध्ये लागलेल्या स्टाॅलवरील बिस्किटांचीही हाताेहात विक्री झाल्याचे लाेकमत प्रतिनिधीला निदर्शनास आले. सध्या जागतिक मार्केटमध्ये स्टिव्हीयाची मागणी ४९०.१ दशलक्ष डाॅलरवर पाेहोचली असून, यात दरवर्षी ९.५ टक्क्यांची वाढ हाेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील शेतकऱ्यांनाही आवाहन
डाॅ. सिंह यांनी सांगितले, स्टिव्हीयाची शेती विदर्भातील जमिनीवरही शक्य आहे. एका एकरात १०० ते १५० ग्रॅम बियाण्यांनी पेरणी केली जाऊ शकते. तीन महिन्यांत ३ फूट वाढले की झाड कापावे लागते व कापल्यानंतर पुन्हा वाढ हाेते. वर्षातून तीनदा पीक घेता येते. वर्षातून हेक्टरी ३५ ते ४० क्विंटलचे उत्पादन हाेते आणि शेतकऱ्यांना अडीच ते तीन लाखांचा फायदा हाेऊ शकत असल्याचा दावा डाॅ. सिंह यांनी केला.