अरे सागरा, भीम माझा येथे निजला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:35+5:302020-12-06T04:09:35+5:30
नागपूर : जातीवादाच्या उतरंडीत गुलामाप्रमाणे जगणाऱ्या कोट्यवधी हीनदीनांचे दु:ख दूर करून, त्यांच्या गुलामीच्या शृंखला तोडून या देशात सन्मानाने जगण्याचा ...
नागपूर : जातीवादाच्या उतरंडीत गुलामाप्रमाणे जगणाऱ्या कोट्यवधी हीनदीनांचे दु:ख दूर करून, त्यांच्या गुलामीच्या शृंखला तोडून या देशात सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. भारताला अखंड लोकशाहीच्या मार्गावर नेऊन सोडत या संविधान शिल्पकाराने निरोप घेतला तेव्हा जनसागरही रडला होता. १९५६ ची ती काळरात्र अजूनही सलते आहे. ‘अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरा...’ अशी आर्त हाक हा समाज अभिवादनातून आजही देत आहे.
बोधिसत्त्व महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांकडून आदरांजली अर्पण केली जात आहे. संविधान चौक येथे अभिवादनासाठी अनुयायांचे सत्र सुरू झाले आहे. विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वस्त्यावस्त्यातील बुद्धविहारांमध्ये समाजबांधवांकडून वंदनेसह अभिवादनाचे आयाेजन करण्यात आले आहे. दरम्यान, काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका लक्षात घेता गर्दी करण्यापेक्षा ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमावर अनुयायांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.
भीमांजलीतून ऑनलाईन आदरांजली
डाॅ. बाबासाहेब यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आवाज इंडियाच्या वतीने भीमांजली कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. काेराेनाचे सावट लक्षात घेत कार्यक्रमाचे ऑनलाईन आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता शास्त्रीय संगीत कलावंतांद्वारे सांगीतिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
रिपब्लिकन मूव्हमेंट
रिपब्लिकन मूव्हमेंटतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता संविधान चाैक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती नरेश वाहाने यांनी दिली.
ओएनजीसीतर्फे अभिवादन व्याख्यान
वेर्स्टन ऑफशाेअर युनिट, ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस काॅर्पाेरेशन लिमिटेड तसेच अ.भा. एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर असाेसिएनच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन व्याख्यान आयाेजित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन व्याख्यान सुरू हाेइल. ओएनजीसीचे असि. मॅनेजर कृपाशंकर पांडे, रिजनल ऑफिस सीजीएम हेड सुनील सिंग यांच्यासह भिक्खू डाॅ. आनंद, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खाेब्रागडे, प्रा. सुषमा अंधारे वक्ता म्हणून उपस्थित राहतील.