अबब! शेतकऱ्याची विहीर गेली चोरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:19 AM2018-05-06T01:19:14+5:302018-05-06T01:19:29+5:30
आदल्या दिवशीच ‘ती’ विहीर शेतात होती. शेतातील गोठा जाळल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ‘त्या’ विहिरीत डोकावून बघितले. अशातच दुसऱ्याच दिवशी सकाळपासून विहीर अचानक गायब झाल्याने शेतकरी हतबल झाला. अखेरीस पोलीस ठाणे गाठून त्या शेतकऱ्याने ‘विहीरच चोरीला गेली’ अशी आधी तोंडी आणि नंतर लेखी तक्रार करीत पोलिसांकडे दाद मागितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदल्या दिवशीच ‘ती’ विहीर शेतात होती. शेतातील गोठा जाळल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ‘त्या’ विहिरीत डोकावून बघितले. अशातच दुसऱ्याच दिवशी सकाळपासून विहीर अचानक गायब झाल्याने शेतकरी हतबल झाला. अखेरीस पोलीस ठाणे गाठून त्या शेतकऱ्याने ‘विहीरच चोरीला गेली’ अशी आधी तोंडी आणि नंतर लेखी तक्रार करीत पोलिसांकडे दाद मागितली. विहीर चोरीला गेल्याच्या या अफलातून तक्रारीमुळे पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहे. विहीर चोरी कशी काय जाऊ शकते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
उमरेडच्या इतवारी पेठ अभ्यंकर चौक येथील गुलाब परसराम लाडेकर या शेतकऱ्याने आपली कैफियत शनिवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत मांडली. गुलाब यांची बेलगाव शिवारात केवळ दोन एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचा लहान भाऊ गणेश याने आपल्या मालकीची शेतजमीन विक्रीचा करारनामा एका बिल्डरशी केला. गुलाबचीही शेतजमीन लागूनच असल्याने बिल्डरने गुलाबकडे त्याच्या दोन एकर शेतीचाही सौदा करण्यासाठी विचारणा केली. गुलाबने स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही वारंवार दबावतत्रांचा वापर करण्याचा प्रकार करण्यात आला, असा आरोप गुलाब लाडेकर याने केला. बिल्डरच्या कुरापतींमुळे मी आणि माझे संपूर्ण कुटुंब दहशतीत असल्याचेही शेतकºयाने यावेळी सांगितले.
जेसीबीने शेतातील पीक नेस्तनाबूत करणे, बळजबरीने कुंपण टाकणे, शेतकरी आणि त्याच्या पत्नीस धक्काबुक्की करणे, वडिलोपार्जित वहिवाटीचा मार्ग बंद करणे आणि त्यानंतर शेतातील गोठा जाळणे या संपूर्ण घटनाक्रमामुळे आम्ही कमालीचे हतबल झालो आहे. या संपूर्ण प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली. वारंवार तक्रारीनंतरही पोलिसांनी प्रकरण गुलदस्त्यातच ठेवले. मानसिक, आर्थिक आणि शारिरीक त्रासामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेरीस आमदार बच्चू कडू यांच्याकडे निवेदन दिले. स्थानिक प्रहार संघटनेने दखल घेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडली. पोलीस तक्रारीनंतर शेतात कसेतरी पोलीस शेतापर्यंत पोहोचले. त्यांनीही ही विहीर बघितली. मात्र त्यानंतर बिल्डरने ती विहीरच अक्षरश: बुजविली. परिणामी विहीर चोरीचीही तक्रार करण्यात आली.
आंदोलनाचा इशारा
सदर अल्पभूधारक शेतकऱ्यांने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदन देत न्याय मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे प्रशासन हादरले असून विहीर गेली कुणीकडे, याचा शोध घेणेही सुरू झाले आहे. याप्रकरणी पत्रकारांनी प्रकाश हाके यांच्याशी संपर्क साधला असता, ‘कुणाचीही हयगय केली जाणार नाही. जे निष्पन्न होईल, त्यानुसार गुन्हा दाखल होईल’, असा शब्द दिला.
आणि ती रडली!
पत्रकार परिषदेत गुलाबची पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह हजर होती. मागील अनेक दिवसांपासून भीतीपोटी शेतात पाय ठेवला नाही, असे ती म्हणाली. काही दिवसांपूर्वीच शेतात गेल्यावर मुलांनीही ‘आई, आपली विहीर कुठे गेली?’, असा प्रश्न केला. त्या विहिरीच्याच भरोशावर आमची शेती होती. केवळ दोन एकरात आम्ही कशीबशी आपली उपजीविका करतो. विहीरच नसल्याने आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित करीत ती पत्रकार परिषदेत ढसाढसा रडायला लागली.
अन्यथा प्रहार रस्त्यावर
या प्रकरणात गुलाब लाडेकर आणि त्याच्या कुटुंबीयांना १५ दिवसात न्याय मिळाला नाही, तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रहारचे संदीप कांबळे, राजेंद्र रणदिवे, पंकज राऊत, निखिल नवनागे, प्रमोद रोहणकर, किशोर मराठे, सुभाष साखरकर, शुभम चिमूरकर, नितीन अवचट, संजय अतकरी, रामेश्वर शेंदरे आदींनी दिला. यानंतर त्या शेतकऱ्यांला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजीही प्रहार घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उमरेड - भिवापूर आणि कुही तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.