अबब ! एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:51 PM2019-10-10T23:51:08+5:302019-10-10T23:52:14+5:30
विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा मतदार संघात विशेषत: ग्रामीण भागातील मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा मतदार संघात विशेषत: ग्रामीण भागातील मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार विजयबाबू घोडमारे यांना पक्षाने हिंगणा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधातही एक विजय घोडमारे उभे आहेत. निवडणुकीच्या रिंगणात येथे दोन विजय घोडमारे आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर दुसरे अपक्ष उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार घोडमारे यांना फुटबॉल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
काटोलमध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे. येथे भाजपने चरणसिंह ठाकूर यांना मैदानात उतरविले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांच्यासह १० उमेदवनार रिंगणात आहेत. यापैकी एकाचे नाव चरण कमल ठाकूर आहे. अपक्ष असलेल्या चरण ठाकूर यांना फुलकोबी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या नावाच्याही एका उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. परंतु शेवटच्या दिवशी त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.