विदर्भात सुरू व्हावी ऑईल रिफायनरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:05 AM2021-02-27T11:05:15+5:302021-02-27T11:05:36+5:30
Nagpur News विदर्भात ऑईल रिफायनरी व पेट्रो केमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिलने (वेद) गेल्या एक दशकापासून ही मागणी केंद्र आणि राज्य स्तरावर लावून धरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात ऑईल रिफायनरी व पेट्रो केमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिलने (वेद) गेल्या एक दशकापासून ही मागणी केंद्र आणि राज्य स्तरावर लावून धरली आहे. वेदने रिफायनरीचे तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यवहार्यताचे अध्ययन करण्याची मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांच्याकडे केली आहे. वेदच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रिफायनरीवर चर्चा केली. गडकरी यांनीही विदर्भात ऑईल रिफायनरी आवश्यक असल्यावर भर दिला आहे.
गडकरी म्हणाले, या संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली आहे. हा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास विदर्भाचे चित्र बदलेल आणि उद्योगांसह रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. पेट्रोलियम उत्पादनाच्या वाहतुकीसाठी जास्त खर्च येतो. हेसुद्धा विदर्भ औद्योगिक विकासात मागे राहण्याचे एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गालगत नागपूरपर्यंत क्रूड पेट्रोलियम पाईपलाईन टाकता येऊ शकते. यामुळे प्लास्टिक, केमिकल, डिटर्जेंट लुब्रिकेंट्स उद्योग विदर्भात सुरू होऊ शकतात. विदर्भात तेल रिफायनरी सुरू झाल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या एक ते दीड लाख लोकांना रोजगार मिळू शकतात.
वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव म्हणाले, मध्य भारतात १४ ते १५ एमटीपीए इंधनचा उपयोग करण्यात येतो. त्याची आवश्यकता विदर्भात प्रकल्प सुरू करून पूर्ण करता येते. विदर्भात ३० सिमेंट प्रकल्प आहेत. याशिवाय अनेक टेक्सटाईल युनिट आहेत. त्याला पीटीए आणि एमईजीकडून पेट्रोलियम उत्पादने सहजरीत्या उपलब्ध होतील. त्यामुळे विदर्भात ऑईल रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता वेद सर्व स्तरावर पाठपुरावा करीत आहे. वेदतर्फे सर्व मंत्र्यांना प्रकल्पाबाबत सादरीकरण देणार आहे.