नागपुरातील ओलाचे इलेक्ट्रीक कार चालक संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:39 PM2019-07-26T22:39:46+5:302019-07-26T22:41:05+5:30
नागपूर इलेक्ट्रीक ओला पार्टनर ग्रुपच्या नेतृत्वात सर्व इलेक्ट्रीक कारच्या चालकांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. कार चालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय देत नसेल तर एक हजार रुपये किराया कमी करून ५०० रुपये करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी नागपूरात ओला कॅबतर्फे इलेक्ट्रीक कार सुरू करण्यात आल्या. १५००० रुपयांचे डिपॉझिट घेऊन १ हजार रुपये रोज भाड्यावर या कार देण्यात आल्या. या कार चालकांना रोज मिळणाऱ्या व्यवसायातून १ हजार रुपये ओला व्यवस्थापनाला व ६०० ते ७०० रुपये कार चार्जिंग करण्यासाठी द्यावे लागतात. असे असतानाही १२ तास ऑनलाईन राहुनही दीड ते दोन हजार रुपयांचा व्यवसाय मिळतो. हे कार चालकांना परवडणारे नसल्याने, त्यांनी ओला व्यवस्थापनाकडे अडीच ते तीन हजाराचा व्यवसाय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीला व्यवस्थापनाने दुजोरा न दिल्याने नागपूर इलेक्ट्रीक ओला पार्टनर ग्रुपच्या नेतृत्वात सर्व इलेक्ट्रीक कारच्या चालकांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. कार चालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय देत नसेल तर एक हजार रुपये किराया कमी करून ५०० रुपये करावा. बारा तास ऑनलाईन राहून दोन हजार रुपयांचा व्यवसाय मिळाल्यानंतर १७०० रुपये आम्हाला कंपनीला द्यावे लागतात. हे आम्हाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ओला व्यवस्थापन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत संप कायम राहिल, असा इशारा कार चालकांनी दिला आहे. शहरात जवळपास ओलाच्या १०० इलेक्ट्रीक कार धावत आहे.