परीक्षेत मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:27 PM2018-03-21T22:27:40+5:302018-03-21T22:27:53+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासानंतर या प्रश्नपत्रिका बदलविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोपविण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासानंतर या प्रश्नपत्रिका बदलविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोपविण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे काही परीक्षा केंद्रांवर तर विद्यार्थ्यांनी जुन्याच प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत.
यंदा ‘बीबीए’ प्रथम सत्राचा अभ्यासक्रम बदलविण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. सोबतच जुन्या अभ्यासक्रमानुसार ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांचाही पेपर होता. सकाळी ९.३० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतील १७ ते १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती. नवीन आणि जुन्या पेपरचा विषय सारखाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांना चूक लक्षात आलीच नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही तफावत लक्षात आली व तत्काळ त्यांनी ही बाब परीक्षा केंद्र अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत परीक्षा भवनातदेखील कळविण्यात आले.
परीक्षा भवनातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर जुन्या व नवीन अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे एक ते दीड तासांनी प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आल्या, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.
‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय होणार ?
दरम्यान, दोन परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना जुन्या व नव्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकेतील तफावत लक्षातच आली नाही. त्यामुळे त्यांनी नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असूनदेखील जुनीच प्रश्नपत्रिका सोडविली. संबंधित विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परत परीक्षा घेण्याची मागणी केली. यासंदर्भात अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निर्णय घ्यावा लागेल, असे डॉ.खटी यांनी स्पष्ट केले.