नागपुरातील जुन्या पुस्तकांची बाजारपेठ उठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:31 AM2018-06-15T10:31:22+5:302018-06-15T10:31:43+5:30
८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला. व्यवसायासाठी सर्व जुन्या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जुन्या पुस्तक विक्रेत्यांना देण्यात आले होते. परंतु आता प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. परिणामी या पुस्तक विक्रेत्यांपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील जागेत तब्बल ८५ वर्षांपासून जुन्या पुस्तकांचा बाजार भरत होता. हा बाजार म्हणजे नागपूरची ओळख झाला होता. या बाजारातील पुस्तकांच्या विक्रीवर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. परंतु मेट्रो रेल्वेने हा आधारच हिरावला आहे. या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळावी, यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता.
शहराच्या विकास कामासाठी येथील पुस्तक विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाची जागा दिली. तेव्हा प्रशासनानेही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. तेव्हा पर्यायी जगा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी आता पुस्तक विक्रेत्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने पावसाळी अधिवेशनादरम्यान ७ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
आता आम्ही जगायचे कसे?
मेट्रोच्या विकासासाठी मेट्रो रेल्वे हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे जुन्या पुस्तक विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपली जागा सोडली. परंतु आता पुस्तक विकेत्यांसह दुकानात काम करणाऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन व शासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यायी जागा द्यावी.
- नरेश वाहाणे, अध्यक्ष,
नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था