'त्यांच्या' तर आयुष्याच्या पुस्तकाचे कव्हर फाटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 12:15 PM2020-05-06T12:15:35+5:302020-05-06T12:15:57+5:30

लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Old booksellers in crisis in Nagpur | 'त्यांच्या' तर आयुष्याच्या पुस्तकाचे कव्हर फाटले!

'त्यांच्या' तर आयुष्याच्या पुस्तकाचे कव्हर फाटले!

Next

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रूपाने फार मोठे संकट उभे झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, रोजगार गेले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले आहे. लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शहरात जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा जवळपास १०० वर्षाचा इतिहास आहे. अनेक जुने सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत लोक या दुकानांचा उल्लेख करतात. सध्या सीताबर्डी मेन रोडवर ३० च्यावर पुस्तकांची दुकाने आहेत. याशिवाय महाल, सदर, रामनगर तसेच हिंगणा रोड आदी परिसरात जुन्या पुस्तकांची दुकाने आहेत. एका दुकानात २ ते ३ कामगार असा विचार केल्यास अडीचशेच्या वर लोकांची कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या संकटाने इतर व्यवसायाप्रमाणे पुस्तक विक्रीचा व्यवसायही गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडला आहे. या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे रोजीप्रमाणे चालते. लॉकडाऊनमध्ये विक्रेत्यांसोबत या कामगारांचाही रोजगार बंद पडला आहे. त्यामुळे या कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेचे नरेश वाहाने यांनी या कामगारांच्या दयनीय अवस्थेची माहिती दिली. बहुतेकांच्या कुटुंबांचे उदरभरण आणि मुलांच्या शिक्षणाचे साधन यावरच अवलंबून आहे. दुकाने बंद झाल्याने सर्वच लोक हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यापासून रोजगार नसल्याने हे लोक पैशापैशाला मोहताज झाले आहेत. घरात अन्नाची भ्रांत, मुलांचे भुकेले चेहरे बघून अनेकजण मनातून कोलमडले आहेत. सीताबर्डीत मेट्रोचे काम व महालमध्ये रस्त्याच्या विस्तारीकरणात आधीच विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आली होती आणि आता कोरोनाच्या संकटाने ते पुरते मोडले असून या परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

एकमेकांना उधारी मागून जगणे
नरेश वाहाने यांनी सांगितले की, संघटनेचा अध्यक्ष म्हणून दररोज दुकानात काम करणाºया अनेकांचे फोन मदतीसाठी येतात. अनेकजण एकमेकांना उधारी मागून कुटुंबाची गरज भागविण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाचे आभाळ फाटले असल्याने कोण कुणाची कशी मदत करेल, हा प्रश्न आहे.

 

Web Title: Old booksellers in crisis in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.