नागपुरात अन्नपाण्याविना गेला सधन वृद्ध दाम्पत्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:53 AM2018-10-09T11:53:12+5:302018-10-09T11:56:38+5:30

समृद्ध स्थिती असलेल्या एका दाम्पत्याचा अन्नपाण्याविना बळी गेला. वृद्ध महिलेचा मृतदेह तीन दिवसांपासून घरात पडून राहिला तर दुर्गंधी सुटल्यामुळे पोलिसांनी जेव्हा दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा वृद्ध व्यक्ती शेवटच्या घटका मोजत होता.

Old couple died without food in Nagpur | नागपुरात अन्नपाण्याविना गेला सधन वृद्ध दाम्पत्याचा बळी

नागपुरात अन्नपाण्याविना गेला सधन वृद्ध दाम्पत्याचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देनंदनवनमधील घटना घरात पडून होता वृद्धेचा मृतदेह तर वृद्ध मोजत होता शेवटच्या घटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समृद्ध स्थिती असलेल्या एका दाम्पत्याचा अन्नपाण्याविना बळी गेला. वृद्ध महिलेचा मृतदेह तीन दिवसांपासून घरात पडून राहिला तर दुर्गंधी सुटल्यामुळे पोलिसांनी जेव्हा दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा वृद्ध व्यक्ती शेवटच्या घटका मोजत होता. त्यालाही रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकांतवासाचा अत्यंत भयावह परिणाम म्हणून पुढे आलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
डॉ. स्टेला फ्रँकलिन डेनियल (वय ६५) आणि फ्रँकलिन डेनियल (वय ७०) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. उच्चशिक्षित असलेले डेनियल दाम्पत्य नंदनवनमधील व्यंकटेशनगर एच बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर २१४ क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते. त्यांना दोन मुली आहेत.
त्यातील एक मुलगी लंडनमध्ये तर दुसरी नागपुरात नंदनवनमध्येच राहते. डॉ. स्टेला बालरोगतज्ज्ञ होत्या तर फ्रँकलिन हे व्यावसायिक होते. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली होती. मोठी मुलगी लंडनमध्ये स्थायिक झाली तर लहान मुलगी लग्न झाल्यानंतर नंदनवनमध्ये राहायला गेली होती. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डॅनियल दाम्पत्य तुसड्या स्वभावाचे होते. शेजारी, नातेवाईकच नव्हे तर मुलींना घरी येण्यासाठीही ते मनाई करायचे. एवढी चांगली आर्थिक स्थिती असूनही त्यांनी देखभालीसाठी कुणी ठेवले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी जात-येत नव्हते. तीन दिवसांपासून त्यांच्या घरात शेजाऱ्यांना हालचाल जाणवली नाही. शनिवारी त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी नंदनवन पोलिसांना फोन करून माहिती दिली. ठाणेदार विनायक चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घराचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी डॉ. स्टेला यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. फ्रँंकलिनसुद्धा अर्धमेल्यावस्थेत शेवटच्या घटका मोजत होते. पोलिसांनी लगेच त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे त्यांचाही मृत्यू झाला. एकांतवासामुळे सधन दाम्पत्याचा अन्नपाण्याविना मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविल्याचे समजते. नंदनवन पोलिसानी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

फोन लागला लंडनला
डॅनियल दाम्पत्याच्या घरात पोलीस शिरले तेव्हा त्यांना त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटविणारे कोणतेही साधन दिसले नाही. एक साधा मोबाईल पडलेला होता. त्यात एकच नंबर फीड होता. तो डायल केला असता लंडनच्या मुलीला फोन लागला.तिने नागपुरातील बहिणीचा संपर्क क्रमांक कळविला. त्यानंतर पोलिसांनी डॅनियल दाम्पत्याच्या नागपुरात राहणाऱ्या मुलीला बोलवून घेतले. ती आठ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी तिने त्यांना जेवण दिले होते. तेव्हापासून डॅनियल दाम्पत्य अन्नपाण्यावाचूनच होते, असा अंदाज पोलिसांनी काढला आहे.

Web Title: Old couple died without food in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू