जुना धान्यगंज झाले समस्यागंज

By Admin | Published: March 26, 2016 02:47 AM2016-03-26T02:47:04+5:302016-03-26T02:47:04+5:30

शहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे.

Old grains have become problematic | जुना धान्यगंज झाले समस्यागंज

जुना धान्यगंज झाले समस्यागंज

googlenewsNext

नगर प्रशासनाचे दुर्लक्ष : बाजारामुळे मंदिरात जाण्याचा मार्ग बंद होतो
बाबा टेकाडे सावनेर
शहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे. या ठिकाणी भाजीपाला विक्रेते रोज दुकाने थाटतात. सकाळी या बाजारात ग्राहकांची चिक्कार गर्दी असते. वास्तवात, या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना तसेच देवीच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो. बाजारात टाकण्यात येत असलेल्या टाकाऊ वस्तू व पदार्थांची वेळीच योग्य विल्हेवाट लावली जात नाही. या समस्या सोडविण्यात याव्या तसेच बाजारात मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगर प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. परंतु, प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
धान्यगंज बाजार हा शहरातील जुना बाजार आहे. पूर्वी या ठिकाणी धान्याचा बाजार भरायचा. त्यामुळे या बाजाराला धान्यगंज असे नाव रूढ झाले. कालांतराने या जागेवर धान्याऐवजी भाजीपाला व इतर वस्तूंचा बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजारात देवीचे मंदिर असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या बाजारात भाजीपाल्यासह मासोळी, चिकन, मटनाची दुकानेही थाटली जातात. बाजार आटोपल्यानंतर टाकाऊ भाजीपाल्यासोबत मांसाचे तुकडे याच परिसरात फेकले जातात. काही दिवसांनी ते सडतात व त्याची दुर्गंधी सुटते. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय, पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असते.
हीच समस्या शहरातील ठोक भाजीबाजाराची आहे. या भाजीबाजारात तालुक्यातील तसेच शेजारच्या तालुक्यातील शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला नियमित विक्रीला आणतात. त्यामुळे या बाजारात रोज सकाळी, ट्रक, ट्रॅक्टर, मेटॅडोर यासह तीनचाकी मालवाहू वाहनांची वर्दळ असते. वाहनांची एकच गर्दी होत असल्याने तिथून पायी मार्ग काढणे अवघड होते. त्यातून वाहनचालकांची भांडणेही होतात. रोज होणारी किरकोळ भांडणे सामान्य होत चालली आहे.
या दोन्ही बाजारस्थळांची नियमित साफसफाई केली जात नसल्याने तिथे गुरे, कुत्री व डुकरांचा वावर वाढला आहे. त्यातच नागरिक कुठेही आडोशाला लघुशंका व घाण करतात. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीसोबतच कुत्री व डुकरांचाही त्रास सहन करावा लागतो. या बाजारस्थळांपासून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला उत्पन्न मिळत असले तरी, या जागेची साफसफाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बाजार स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव
शहरातील जुना धान्यगंज तसेच ठोक भाजीपाला बाजारातील मटण, चिकन दुकानांमुळे समस्येत भर पडत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजारांमधील सदर दुकाने कोलार नदीच्या तीरावर स्थानांतरित करण्याचा स्थानिक नगर प्रशासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १३ मे २०१५ रोजी पार पडलेल्या नगर परिषदेच्या आमसभेत सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला. १० महिने लोटूनही या ठरावावर प्रशासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बाजार परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
‘कृउबास’ची तयारी
शहरातील ठोक भाजीपाला बाजारामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा ठोक बाजार सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्याची तयारी बाजार समिती प्रशासनाने दर्शविली असून, याला बाजार समिती सभापती गुणवंत चौधरी व सचिव अरविंद दाते यांनी दुजोरा दिला आहे. परिणामी, बाजारात सुविधांची निर्मिती करण्याची तसेच समस्या सोडविण्याची तयारीही बाजार समिती प्रशासनाने दर्शविली. परंतु, शहरातील काही दलालांनी त्यांच्या स्वार्थापोटी या निर्णयाला विरोध दर्शविल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. ही समस्या सोडविण्यात प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Web Title: Old grains have become problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.